सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेततळयातील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने शेततळ्यात विषारी औषध टाकल्यामुळे हे मासे मृत्युमुखी पडले अशी चर्चा नागरिक करत आहेत.
येथील सुनील कारंडे यांनी आपल्या बागायती शेतीसाठी शेतात शेततळे केले होते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी शेततळ्यात मच्छीपालन केले होते. कारंडे यांनी आपल्या शेततळयात चिलाप जातीचे मासे सोडले होते. या माशांचं वजन एक किलोच्या आसपास झालं होत. काही दिवसातच या माशांची विक्री केली जाणार होती. त्यातच रात्री अज्ञात व्यक्तीने तळयात विषारी औषध टाकल्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये या शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
परस्पर हेवेदाव्यातून हा प्रकार जवळच्याच कोणीतरी केला असावा अशी चर्चा गावातील नागरिक करत आहेत. मात्र हे नेमकं कोणी केलं असावं याबाबत अजून काही माहिती समोर आली नाही. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.