कराड | मुंढे (ता. कराड) येथील सख्ख्या बहिण-भावाच्या मृत्युनंतर पोलिसांनी या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे. मृत मुलांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून व्हिसेरासह कीटकनाशक पावडर आणि धान्याचा नमुना तपासणीसाठी पुण्याला प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे. दरम्यान, मृत मुलांच्या आई, वडिलांसह पाचजणांना रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सामान्य आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मुंढे येथील तनिष्का अरविंद माळी व श्लोक अरविंद माळी या दोघांचा कीटकनाशक पावडरच्या उग्र वासाने मृत्यू झाला. माळी कुटूंबियांनी भाताला कीड लागू नये, यासाठी भात भरलेल्या हौदात कीटकनाशक पावडर टाकली होती. संबंधित हौद असलेल्या खोलीत तनिष्का व श्लोक हे आपल्या आई-वडिलांसोबत झोपत होते. दि. 5 फेब्रुवारीला ही पावडर टाकण्यात आली होती. त्यानंतर सलग पाच ते सहा दिवस पावडरच्या उग्र वासातच ही मुले रात्रीची झोपत होती. सोमवारी श्लोकला अचानक त्रास जाणवू लागला. त्याला पोटदुखी होत असल्यामुळे तसेच उलट्या झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
तर दुसऱ्याच दिवशी तनिष्कालाही तसाच त्रास होऊन उपचार सुरू असताना तिचाही मृत्यू झाला. बुधवारी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रविण जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच नातेवाईकांचे जबाब घेतली. दोन्ही मुलांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तसेच हौदातील धान्य, पावडर आणि व्हिसेरा तपासणीसाठी पुण्याला प्रयोगशाळेत पाठविला जाणार असल्याचे उपनिरीक्षक जाधव यांनी सांगीतले.