सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झाले असून, 18 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. परंतु खातेवाटप न केल्याने व पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविलेली नाही. स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यांत ध्वजारोहण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी जिल्हा मुख्यालयात कोणी ध्वजारोहण करणार आहे, याची यादीच प्रसिद्ध केली आहे. या यादीमुळे पालकमंत्री पदी याच मंत्र्याच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
सातारा जिल्ह्याच्या मुख्यालयात कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यामुळे त्याच्याच नावाची पालकमंत्री पदी वर्णी लागण्याचे वेध कार्यकर्त्यांना लागले आहेत. शिंदे मंत्रिमंडळात खातेवाटपाचा पेच अजून कायम आहे. खातेवाटप होत नसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री अजून नियुक्त झालेले नाहीत. अशातच स्वातंत्र्यदिन जवळ येऊन ठेपला असताना ध्वजारोहण कुणाच्या हस्ते होईल, याविषयी उत्सुकता होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करेल, याची यादी तयार केली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमध्ये तर चंद्रकांत पाटील पुण्यात झेंडावंदन करतील.
ध्वजारोहणासाठी नियुक्त झालेले मंत्री पुढीलप्रमाणे- दीपक केसरकर (सिंधुदुर्ग), उदय सामंत (रत्नागिरी), अतुल सावे (परभणी), संदिपान भुमरे (औरंगाबाद ), सुरेश खाडे (सांगली), डॉ. विजयकुमार गावित (नंदूरबार), तानाजी सावंत (उस्मानाबाद), शंभूराज देसाई (सातारा), अब्दुल सत्तार (जालना ), संजय राठोड (यवतमाळ). अमरावती जिल्ह्यात विभागीय आयुक्त तर कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशीम, बुलढाणा, पालघर आणि नांदेड येथे संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.