नवी दिल्ली | मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत चर्चा सुरु होती. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांनी नरेंद्र मोदी सरकारवर खडखडून टीका केली. आपल्या भाषणातून राहुल यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. लोकसभेतील भाषण संपवून राहुल यांनी पंतप्रधान मोदीचे आसन गाठले आणि चक्क मोदींना मिठी मारली. राहुल यांच्या या अनपेक्षित कृत्याने सर्वच खासदार अचंबित झाले.
माझ्या डोळ्यात डोळे घालून पंतप्रधान बोलू शकत नाहीत असे राहुल म्हणाले. तसेच पंतप्रधान चौकीदार नाहीत तर भागीदार आहेत असे ही ते म्हणाले. भाषणाच्या शेवटी राहुल गांधी उपरोधकपणे संघ आणि भाजपाला उद्देशून, ‘हिंदू धर्म काय असतो हे तुम्ही मला शिकवले, महादेव कोण आहे हे तुम्ही मला शिकवले, राम कोण आहे हे तुम्ही मला शिकवले’ असे उद्गार काढले.
तुम्ही मला शिव्या द्या, मला पप्पू म्हणा, मी तुमचा द्वेष करणार नाही. मी तुमच्यामधील द्वेषाला बाहेर काढून त्याला प्रेमात परिवर्तित करेन. माझ्या मनात तुमच्या बद्दल फक्त प्रेम आहे’ असे म्हणून राहुल यांनी भाषण संपवले. थेट पंतप्रधानांचे आसन गाठून पंतप्रधानांना राहुल गांधी यांनी मिठी मारली..