जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता समीकरणांवर भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्यासह काँग्रेसचे शहर सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर बिनविरोध निवडून आले आहेत. याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे तर क आणि ड ऑडिट वर्गातील उमेदवारांना निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बँकेच्या उमेदवाराच्या अर्जाची शनिवारी पुन्हा छाननी झाली. यामध्ये आमदार रमेश बोरणारे, संजय वाघचौरे, भाऊसाहेब चिकटगावकर, जिल्हा परिषदेचे सभापती किशोर बलांडेसह १४ जणांचे अर्ज बाद झाले. आता २१ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक रिंगणात एकूण २०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननीत वेगवेगळ्या कारणांनी ५७ अर्ज बाद ठरल्यानंतर १४८ जण रिंगणात होते. तर अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह ८८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. दरम्यान ज्या संस्थांना ऑडिट मध्ये वर्ग क आणि ड दर्जा असलेल्या सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना निवडणूक लढविता येणार नाही असे निर्णय हायकोर्टाने दिला आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या अर्जांची फेर छाननी केली. यात लेखा परीक्षणाचा क, व ड वर्ग दर्जा मिळालेल्या सोसायट्यांच्या तेरा सभासदांचे अर्ज बाद झाले. सकाळी दहा वाजेपासून दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत छाननी सुरू होती.

मंत्री भुमरे, डोणगावकर बिनविरोध

प्राथमिक ऋषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था पैठण या मतदारसंघातून फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे तर सेवा सहकारी संस्था खुलताबाद या मतदारसंघातून काँग्रेस सरचिटणीस किरण पाटील डोनगावकर हे संचालक पदी बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात असलेले अन्य अर्ज बाद झाले आहेत.

हे आहेत रिंगणात

आमदार हरिभाऊ बागडे, सतीश चव्हाण, अंबादास दानवे, माजी आमदार नितीन पाटील, अभिजित देशमुख, जगन्नाथ काळे, देवयानी पाटील, दिनेश परदेशी, जयराम साळुंखे, रवींद्र काळे, एकनाथ जाधव, शहानवाज खान अ.रहेमान खाॅं यांच्यासह एकूण पन्नास उमेदवार रिंगणात असून त्यापैकी दोघांची बिनविरोध निवड झाली आहे तर २१ मार्च रोजी मतदान आहे.

दोन्ही पॅनेलला एक-एक जागा

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे शेतकरी विकास पॅनल व बहुतांश काँग्रेसचे उमेदवार असणाऱ्या माजी आमदार डॉ. कल्याण काळे, सुभाष झांबड, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या पॅनेलमध्ये रंगतदार लढत होणार आहे.निवडणुकीपूर्वी दोन्ही पॅनल मधील संदिपान भुमरे आणि किरण डोणगावकर हे बिनविरोध विजयी झाल्याने दोन्ही पॅनल ने आपला पहिला विजय नोंदविला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment