कराड | तांबवे (ता. कराड) येथील कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्टच्या फुटबॉल टीमतर्फे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत आर. एस. बॉईज कोल्हापूरच्या संघाने अंतिम सामन्यात 4-0 असा विजय इस्लामपूरच्या रॉयल एफसी संघावर मिळवला. या सामन्यात मुंबई, पुणे येथील संघाना पराभूत करत कोल्हापूरच्या व इस्लामपूरच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारली.
येथील स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या क्रीडांगणावर तीन दिवस या स्पर्धा सुरू पार पाडल्या. त्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यांतील संघांनी सहभाग घेतला होता. ट्रस्टतर्फे संबंधित संघांची मुक्कामी राहणे व भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर इस्लामपूरचा रॉयल एफसी, मुंबईचा बीएनएफसी आणि व्हेनिझा या संघानी उपविजेतेपद पटकावले. यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निवासराव पाटील, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, इन्फिनिटी ट्रेडर्स पाटणचे प्रणव पवार, उद्योजक सुनील बामणे, वेलमाटॅ फार्मसीचे हेमंत मोरे, डॉ. विकास पाटील, डॉ. शरद पाटील, राष्ट्रीय खेळाडू अतुल पाटील, विठोबा पाटील, शंकर पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीस वितरण झाले. साई हॉस्पिटलचे डॉ. विजयसिंह पाटील, अॅपल हॉस्पिटलचे डॉ. संदीप बानुगडे, उद्योजक अशोक पाटील, दत्तात्रय पाटील, नीलेश भोसले, अनिल बाबर, रेल्वे पोलिस अक्षय देसाई, अविनाश फल्ले, मंगेश पाटील यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले.
स्पर्धेत मुंबईच्या फुटबॉल संघामधून परदेशातील खेळाडूही सहभागी होते. स्पर्धेचे ते आकर्षण ठरले. तांबवे गावात स्पर्धेसाठी पहिल्यांदाच परदेशी खेळाडू आल्याने त्यांना पाहण्यासाठी ग्रामस्थांसह तरुणांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शनही केले. राजदीप पवार यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब शिंदे यांनी आभार मानले. अमित यादव यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेसाठी सर्व फुटबॉल टीमच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.