बीजिंग । चीनच्या वुहानमध्ये एका वर्षाच्या आत कोरोना विषाणूच्या संसर्गाची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने संपूर्ण लोकसंख्येची कोविड-19 टेस्ट (Covid-19 Test) करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील वुहान हे असे शहर आहे जिथे सर्वांत पहिल्यांदा कोरोनाव्हायरसचा संसर्ग (Coronavirus Infection) पसरला होता आणि आता जवळजवळ एक वर्षानंतर वुहानमध्ये कोरोनाचे स्थानिक प्रकरण समोर आले आहे.
मंगळवारी पत्रकार परिषदेत वुहानमधील स्थानिक प्रशासकीय अधिकारी ली ताओ यांनी सांगितले की,” लवकरच सर्व लोकांची एसिड टेस्ट घेण्याची मोहीम सुरू केली जाईल. चीनच्या वुहान शहराची लोकसंख्या 1 कोटी (11 मिलियन) पेक्षा जास्त आहे.
यापूर्वी सोमवारी, वुहानच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले की, शहरातील स्थलांतरित मजुरांमध्ये कोरोना संसर्गाची सात स्थानिक प्रकरणे आढळली आहेत. 2020 च्या सुरुवातीच्या महिन्यांत चीनने वुहानमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव यशस्वीपणे नियंत्रित केल्याचा दावा केल्यावर ही प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर, जवळजवळ वर्षभर वुहानमध्ये संसर्गाचे कोणतेही स्थानिक प्रकरण आढळले नाही.
वुहानमध्ये विषाणूचा संसर्ग पसरल्यानंतर चीनने आपल्या नागरिकांना त्यांच्या घरातच कैद केले. यासह, घरगुती वाहतूक सुविधा देखील बंद करण्यात आल्या आणि कोविड टेस्टिंगसाठी एक मोठी मोहीम सुरू करण्यात आली. वुहानमध्ये अनेक महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक दिसून येत होता. वुहान हे जगातील सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक आहे.
चीनमध्ये मंगळवारी कोरोना विषाणू संसर्गाची 61 प्रकरणे नोंदली गेली आहेत. चीनच्या नानजिंग विमानतळावरील सफाई कामगारांना संक्रमित केल्यानंतर कोरोनाचा डेल्टा व्हेरिएन्ट अनेक शहरांमध्ये पसरला आहे आणि संक्रमणाचा प्रसार दर खूप वेगवान आहे. चीनच्या विविध भागातून कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत.