हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील मारकनार (Markanar) गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू झाली आहे. ही बस अहेरी (Aheri) ते मारकनार मार्गावर धावणार असून, या सेवा सुरू होताच गावकऱ्यांनी राष्ट्रीय झेंडा फडकावून आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या पुढाकाराने या गावात बस सेवा सुरु करण्यात आली. या बस सेवेचा फायदा मारकनार आणि आसपासच्या गावांतील विद्यार्थ्यांसह सुमारे १,२०० रहिवाशांना होईल, असे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मारकनार हे एकेकाळी नक्षलवादी हिंसाचाराचे केंद्र म्हणून ओळखळे जात होते.
आदिवासी लोकसंख्या आणि नक्षलग्रस्त भागांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याला बऱ्याच काळापासून खराब कनेक्टिव्हिटीचा सामना करावा लागत आहे. दुर्गम भाग असल्याने याठिकाणी रस्ते वाहतुकीचा खेळखंडोबा आहे. नागरिकांना अनेक किलोमीटर पायी प्रवास करावा लागतोय. मात्र आता प्रथमच मारकनार सारख्या नक्षलग्रस्त भागात महाराष्ट्र शासनाची बस पोचल्याने नागरिक चांगलेच खुश झाले आहेत. गावकऱ्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या परिसरात बस बघितली आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मरकणारचे गाव पाटील झुरु मालु मट्टामी यांनी सदर बस सेवेचे उद्घाटन केले. यावेळी सीआरपीएफ ३७ बटालियनचे असिस्टंट कमांडंट अविनाश चौधरी, कोठीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिलीप गवळी यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. यावेळी पोलीस दलामार्फत उपस्थित नागरिकांमध्ये मिठाईचे वाटप करुन आनंद व्यक्त करण्यात आला.
या बसमार्फत मारकनारसह फुलणार, कोपर्शी, पोयरकोठी, मुरुमभुशी, गुंडूरवाही अशा सहा गावांचे सुमारे 1,200 जण (विद्यार्थी, रुग्ण, कामगार) लाभान्वित होणार आहेत. विशेषतः रुग्ण, विद्यार्थी आणि इतर दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना होईल. पूर्वी या गावातील लोकांना कोठीपर्यंत पोहोचण्यासाठी नऊ–दहा तास जंगलात पायी चालावे लागायचे. दुर्गम भागात वाहतूक सुलभ करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा-गर्देवाडा-वांगेटुरी मार्गावर आणि २७ एप्रिल रोजी काटेझर ते गडचिरोली बस सेवा सुरू करण्यात आल्या.