सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कोरेगाव तालुक्यातील तहसील कार्यालतील कारकूनाला लाच घेतल्याप्रकरणी सातारा न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सुलतानवाडी येथील जमिनीसंदर्भात सुरू असणारी कायदेशीर प्रक्रिया निकाली काढण्यासाठी 10 हजारांची लाच घेतली होती. प्रवीण रघुनाथ कुंभार (रा. कोरेगाव) असे शिक्षा झालेल्या कारकूनाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, कोरेगाव तहसीलदार कार्यालयात प्रवीण कुंभार महसूल कारकून होते. सुलतानवाडी येथे दोघांनी शेतजमिनीची खरेदी केली होती. या खरेदीपत्रानंतरच्या काळात जमिनीबाबत कायदेशीर वाद निर्माण झाला होता. सदरील जमिनीची कायदेशीर प्रक्रिया प्रवीण कुंभार यांच्याकडे आली. जमिनीची तक्रार निकाली काढण्यासाठी जमीनमालकाकडे 2012 मध्ये 10 हजारांची लाच मागितली होती. याची तक्रार त्या जमीनमालकाने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या केली होती. यानुसार तत्कालीन पथकाने कारकूनास दहा हजारांची लाच घेताना पकडले होते. या गुन्ह्याचा तपास करत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या तत्कालीन निरीक्षिका वैशाली पाटील यांनी दोषारोपपत्र सातारा येथील न्यायालयात सादर केले.
यावरील अंतिम सुनावणी विशेष न्यायाधीश एन. एच. जाधव यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान नोंदविलेल्या साक्षी, पुरावे ग्राह्य मानत न्यायाधीश एन. एच. जाधव यांनी प्रवीण कुंभारला तीन वर्षे सक्तमजुरी, 10 हजार दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अॅड. मिलिंद ओक यांनी काम पाहिले. त्यांना पोलिस निरीक्षक सचिन राऊत, सहायक उपनिरीक्षक विजय काटवटे यांनी मदत केली.