व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आम्हांला हिणवले तर आणखी स्फोट होतील; शंभूराज देसाईंचा ठाकरेंना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आम्हाला हिणवलं तर आणखी स्फोट होतील असा इशारा बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी ठाकरे कुटुंबियांना दिला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यासारखी भाषा बोलू नये, आदित्य ठाकरे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. आमच्या सारख्या तीन तीन टर्म आमदार राहिलेल्या पक्ष संघटनेचे काम केलेल्यांना जर ते गद्दार म्हणत असतील तर दुर्दैव आहे असेही शंभूराज देसाई म्हणाले.

आमच्या मनात आणखी खूप काही आहे, अडीच वर्षात खूप काही साठले आहे. त्या आम्ही उघडपनाने बोलू नये, असे शिंदे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत. पण मनात साठवून ठेवण्याच्या पण काही मर्यादा असतात त्यामुळे जर आमची मर्यादा संपली, तर ५० आमदार आणि १२ खासदार यांच्या मनातल्या व्यथा साठलेले कटू अनुभव आम्हाला उघड करावे लागतील, असा इशारा देखील शंभूराजे देसाईंनी यावेळी दिला.

दरम्यान, आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आपल्या जाहीर सभेत ते बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडत आहेत. तुम्हाला आमदार, मंत्रीपदे देऊनही तुम्ही गद्दारी का केली असा सवाल करत तुमच्यात जर हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला उभे रहा असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांना देत आहेत. त्यामुळे आगामी काळात ठाकरे विरुद्ध शिंदे गट हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे.