पाटण | खैर वृक्षाची विनापरवाना तोड करून त्याची वाहतूक करण्याच्या उद्देशाने ढीग मारलेल्या ठिकाणी वनविभागाने छापा टाकून सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील कवरवाडी-चेवलेवाडी येथे रात्री उशीरा कारवाई करण्यात आली. अमरदीप रघुनाथ मोहिते उर्फ बंडू (रा. चिपळूण), वैभव जाधव (रा. आगावे, चिपळूण), सीताराम कवर (रा. कवरवडी), संदीप पवार (रा. मांडवी, चिपळूण) व ट्रॅक्टर मालक सुनिल रामचंद्र कवर (रा. कवरवाडी, ता. पाटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांना मंगळवारी खैर वृक्षांची तोड करून त्याची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्यासाठी पथक तयार करून सापळा लावला. मिळालेल्या माहितीच्या आधारे कवरवाडी येथील चेवलेवाडी येथे छापा टाकला. यावेळी सुनिल कवर हा स्वत:च्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये तोडलेले खैर वृक्षांचे लाकूड मजुरांच्या सहाय्याने विनापरवाना वाहतूक करण्याकरिता भरत असताना आढळून आला.
दरम्यान, आपल्यावर छापा पडल्याचा संशय येताच ट्रॅक्टर क्रमांक (MH- 11- U- 9085), ट्राली क्रमांक (MH- 11- R- 5437) मधील लाकूड तेथेच ओतून अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी शेतातून ट्रॅक्टरसह पळून गेला. कवरवाडीचे पोलीस पाटील राजेंद्र कवर यांच्या मदतीने वनविभागाने सुनील कवर यांच्या घरी जावून दुसर्या दिवशी ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. तसेच रात्री छापा टाकत असताना तीन लोक संशयितरित्या कुर्हाड घेवून जात असताना दिसले होते. त्यांचीही कसून चौकशी केली असता सदरचे खैर लाकूड हे अमरदीप मोहिते याच्या सांगण्यावरून तोडले असल्याचे सांगितले. त्यानुसार संशयित अमरदीप मोहिते उर्फ बंडू, वैभव जाधव, सीताराम कवर, संदीप पवार यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी खैर लाकूड तोडले व साठा करून ठेवल्याची माहिती दिली.
त्यानुसार वाडीकोतवडे, अंब्राग, मुळगाव, चेवलेवडी येथे विनापरवाना लाकूड तोडून साठा करून ठेवल्याचे तपासात मिळून आले. सदरचे खैर लाकूड हे ऐकून 10 घ. मी. तसेच ट्रॅक्टर ट्रॉली असा ऐकून 5 लाखांचा मुद्देमाल वनविभागाने या कारवाईत जप्त केला आहे. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजूर्णे, पाटणचे वनक्षेत्रपाल पोतदार, वनपाल सावर्डेकर, वनरक्षक माने, संजय जाधव, माने, श्रीकांत चव्हाण, आनंदा सकते यांनी ही कारवाई केली. अधिक तपास वनक्षेत्रपाल पोतदार करत आहेत.