शेतकरी संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षास पोलिसाकडून मारहाण प्रकरण; होणार गुन्हा दाखल

Aandolan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी : हॅलो महाराष्ट्र – (गजानन घुंबरे) – शेतकरी संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षास केलेल्या मारहाणी प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेने दैठणा पोलीस स्टेशनला कुलूप ठोको आंदोलनाला यश आले असून दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष गजानन देशमुख यांनी दिली आहे.शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष माधवराव शिंदे यांना मागील महीण्यात विनाकारण शिवीगाळ करत पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहाण झाल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी बळीराम मुंडे यांच्यावर कारवाई न केल्यामुळे ५ जुलै रोजी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे, शेतकरी संघटना कार्य अध्यक्ष ललित बहाळे, शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी यांच्या नेतृत्वात परभणी तालुक्यातील दैठणा पोलीस स्टेशनला कुलुप ठोको आंदोलन करण्यात आले . याठिकाणी पोलीस अधिकारी काकडे तसेच गंगाखेड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या मध्यस्थीनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंद करून निलंबनाची कारवाई लवकरच करण्यात येईल असे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना दिले असता हे आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान आंदोलनस्थळी येणाऱ्या कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी अटक करण्यात आली होती . त्यांना मुक्त करेपर्यंत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परभणी गंगाखेड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले .अटक केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका केल्यानंतर पोलीस बळीराम मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, धुळे, बुलढाणा, जालना, हिंगोली, अकोला, लातूर, नांदेड बीड,औरंगाबाद आदी जिल्हांसह परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.