सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – मोहोळचे माजी आमदार तथा राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे मंगळवारी रात्री पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या मागे पती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, मुलगा अभिजित ढोबळे, सून शारोन अभिजित ढोबळे, दोन मुली क्रांती आवळे व कोमल साळुंखे तसेच जावई अब्राहम आवळे, अजय साळुंखे व नातवंडे असा परिवार आहे. तसेच अनुराधा ढोबळे या सावली वूमेन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष होत्या.
अनुराधा ढोबळे यांचे कार्य
अनुराधा ढोबळे यांनी सावली फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांवरील सांसारिक तणाव कमी करावा यासाठी विविध उपक्रम राबविले. तसेच त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले. तसेच महिलांना बचतीची सवय लागावी म्हणून १० हजार महिलांना त्यांनी पोस्टाची बचत खाते काढून दिले. तसेच त्या शाहू शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शकसुद्धा होत्या. त्यांनी ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले आहे.