सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
खटाव तालुक्यातील पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यातील अधिकार्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना. गुरुवारी (दि. 11) रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, मारहाण करणार्या संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने हॉस्पिटल परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणात वडूज पोलिस ठाण्यातकारखान्याचे चेअरमन मनोज घोरपडे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदीप धोंडीराम थोरात (वय 40, रा. गोवारे, ता. कराड) असे संशयास्पद मृत्यू झालेल्या अधिकार्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यांमध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून जगदीप थोरात कार्यरत होते. कारखान्यात अफरातफर झाल्याच्या कारणावरून जबाबदार म्हणून थोरात यांना मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवार (दि. 10) रोजी घडली. दरम्यान, जगदीप थोरात यांना गुरुवार (दि. 12) रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना सकाळी 6 वाजता कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
उपचार सुरू असताना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांनी मारहाण करणार्या संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मृतदेह वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सायंकाळी उशिरा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन गोवारे येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा