हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रपती कोविंद यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आयोजित मेजवानीत आपण सहभागी होत नसल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी मनमोहनसिंग यांनी मेजवानीचे आमंत्रण स्वीकारले होते, परंतु त्यांनी सोमवारी मेजवानीस उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ.मनमोहन सिंग यांनी मेजवानीला उपस्थित राहू न शकल्याबद्दल राष्ट्रपती कार्यालयाकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना परंपरेनुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्याची परवानगी मोदी सरकारने नाकारली असल्यानं ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतील काँग्रेसचे सदस्य अधीर रंजन चौधरी यांनीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रण न दिल्याच्या निषेधार्थ मेजवानीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.