औरंगाबाद – महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पक्षांतर्गत गटबाजीही चव्हाट्यावर येत आहे. शहराचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड यांनी मोठे आरोप केले आहेत. शहर विकास आराखड्यातून जमा केलेल्या कोट्यवधींच्या मायेतून शिवसेनेचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी शहरालगत अनेक ठिकाणी लाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राधाकृष्ण गायकवाड यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. मात्र तुपे यांनी हे आरोप साफ फेटाळून लावले आहेत.
राधाकृष्ण गायकवाड यांनी आरोप करत शहर विकास आराखड्यात 250 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्यात माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचा हात असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राधाकृष्ण गायकवाड यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक सहा पानी पत्र पाठवून त्यात तुपे यांच्याबद्दल थेट आरोप केले आहेत. त्यात त्यांनी लिहिले आहे की, ‘तुपे यांनी महापौर असताना विकास आराखड्यात जमिनीवर आरक्षण टाकणे, आरक्षण हटवणे यासाठी मनपातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जवळपास 250 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे.’ तसेच तुपे यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असून एसआयटीमार्फत चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान माजी महापौर त्र्यंबर तुपे यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. मी जमिनीचे व्यवहार महापौर झाल्यानंतर केलेले नाहीत. कुठेही पदाचा गैरवापर केला नाही. जमिनीचे व्यवहार जुने आहेत. त्यामुळे गायकवाड हे चुकीचे आरोप करत आहेत, अशी प्रतिक्रिया तुपे यांनी दिली. मात्र आपण महानगरपालिकेतील नगर रचना विभागातील काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊ नये, असे पत्र शासनाला दिले होते. त्यामुळेच या अधिकाऱ्यांनी गायकवाड यांना हाताशी धरून हे आरोप केले असल्याचा आरोप तुपे यांनी केला आहे.