उंब्रज पोलिसांची कामगिरी : अवैध दारूविक्री प्रकरणी पाच महिन्यात साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मसूर येथील अण्णाभाऊ साठेनगर येथे घराचे आडोशास देशी दारूची विक्री करणार्‍यास उंब्रज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 17 हजाराच्या देशी दारूच्या 336 बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अजित दिपक वाघमारे (रा. अण्णाभाऊ साठेनगर, मसूर, ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मसूर येथील अण्णाभाऊ साठेनगर येथे घराचे आडोशास अजित वाघमारे हा देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक पथक तयार करून साठेनगर येथे छापा टाकला असता खाकी रंगाचे बॉक्समध्ये 17 हजार 472 रूपयांच्या 336 बाटल्या मिळून आल्या. याप्रकरणी अजित वाघमारे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक प्रशांत सोरटे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, अनिल पाटील, पोलीस हवालदार दत्तात्रय लवटे, निलेश पवार, पृथ्वीराज जाधव, विशाल नलवडे, होमर्गार्ड स्वप्निल मोर, अमोल निकम, अभिजीत पाटील यांनी केली.

पाच महिन्यात साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

उंब्रज पोलीस स्टेशनने सन 2020 मध्ये सुमारे 137 दारूच्या रेड करून 22 लाख 34 हजार 771 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर सन 2021 मध्ये 10 जून अखेर 75 दारू रेड करून सुमारे 4 लाख 30 हजार 436 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ह्या आठवड्यात पाली, मसूर, उंब्रज, इंदोली, तारळे भागात कारवाई करून 72 हजार 280 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.

Leave a Comment