गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटामध्ये चार घरे जळून खाक, रेस्क्यू ऑपरेशनवेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या पंचशीलनगर मधल्या झोपडपट्टीत शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या आगीमध्ये चार घरे जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळाले. कामानिमित्त या घरातील कुटुंबे बाहेर गेली असल्याने सुदैवाने कोणातीही जीवितहानी झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केले.

या ठिकाणी रेस्क्यू करत असताना अग्निशमन दलातील अधिकारी विजय पवार यांच्यासह चौघे जखमी झाले. यातील फायरमन रामचंद्र चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून ते 25 टक्के भाजले आहेत. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. गॅसचा स्फोट इतका भीषण होता कि परिसरातील काही घरे हादरून गेली होती. दरम्यान, स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

शांतिनिकेतन कॉलेजच्या शेजारी मेंडगुळे वस्ती आहे. याठिकाणी असणाऱ्या रेल्वे रूळ शेजारीच ओपन स्पेस मध्ये झोपडपट्टी आहे. याठिकाणी अनके पत्र्यांची छोटी घरे वसली आहेत. शुक्रवारी या वस्तीतील नंदकुमार जावीर यांच्या घरात गॅस लिकेज झाला. यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. अचानक घडलेल्या या घटनेनं परिसरातील नागरिकांनी धावाधाव सुरु केली. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे चार बंब, रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली. त्याठिकाणची गर्दी बाजूला करून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न अग्निशमनच्या जवानांनी सुरु केले.

या चार घरांमध्ये एकूण आठ सिलेंडर होते त्यातील सात सिलेंडर बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. नंदकुमार जावीर यांच्या घराला कुलूप असल्याने तो सिलेंडर बाहेर काढण्यास अडथळा आला. त्याचवेळी या गॅसचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता कि सदरचा सिलेंडर हा घराचा पत्रा छेदून बाहेर फेकला गेला. याचवेळी याठिकाणी आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे अधिकारी विजय पवार, फायरमन रामचंद्र चव्हाण, सुनील माळी हे गंभीर जखमी झाले. या स्फोटात परिसरातील काही नागरिक किरकोळ जखमी झाले. याठिकाणी असणारे गॅस पथकांनी तातडीने बाहेर काढले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. परिसरातील संग्राम जावीर, नंदकुमार जावीर, दगडू चवरे आणि विजय पडळकर यांच्या घरात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Leave a Comment