औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात अपघाताच्या घटना वाढतच आहेत. अशातच आज उस्मानाबाद येथून लातूरकडे निघालेल्या लातुरातील पाडे कुटुंबावर काळाने घात घाला घातला असून, समोरुन येणाऱ्या कंटेनरवर कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघात चार जण जागीच ठार झाले. हा अपघात उस्मानाबाद-धुळे महामार्गापासून जवळच असलेल्या भडाचीवाडीजवळ आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला. हिरकणाबाई मुरलीधर पाडे (वय 70), उमेश मुरलीधर पाडे (वय 50), सविता उमेश पाडे (वय 45) आणि प्रतिक उमेश पाडे (वय 23) असे मृतांची नावे आहेत.
लातूर येथील प्रकाशनगर येथे राहणारे पाडे कुटुंबीय काही कामानिमित्त कारने (एम.एच. 24 ए.ए. 8055) बाहेरगावी गेले होते. दरम्यान, काम आटोपल्यानंतर ते लातूरच्या दिशेने निघाले असताना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भडाचीवाडी येथे समोरून येणाऱ्या कंटेनरवर नियंत्रण सुटल्याने पाडे यांची कार कंटेनरखाली घुसली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच उस्मानाबाद ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोहेका. एस.एस. कट्टे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने मृतांना बाहेर काढून येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केले.या आपघाताची नोंद उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
मृतांत एकाच कुटुंबातील आई,पती-पत्नी व मुलगा ठार –
या भीषण अपघातात हिरकणाबाई मुरलीधर पाडे (वय 70), उमेश मुरलीधर पाडे (वय 50), सविता उमेश पाडे (वय 45) आणि मुलगा प्रतिक उमेश पाडे (वय 23, सर्व रा. प्रकाश नगर लातूर) यांचा समावेश आहे. हृदय पिळवटून टाकणारे टाकणाऱ्या आपघाताने पाडे कुटुंबावर घालाच घातला आहे.