कराड | अवैध शस्त्र खरेदी- विक्री करताना कराड तालुक्यातील चौघांना पोलिसांनी अटक केली. चौपडा ते शिरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई झाली. संबंधितांकडून 6 गावठी कट्टे, 30 जिवंत काडतूस, चार मोबाईल व चार चाकी असा 37 लाख 37 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात गणेश ऊर्फ सनी शिंदे (वय- 25, रा. ओगलेवाडी), मोहसीन मुजावर (वय- 30, रा. मसूर), रिजवान नदाफ (वय- 23, रा. शिवाजी चौक, मलकापूर) व अक्षय पाटील (वय- 28, रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सागर सरदारशी व सूरज विष्णू साळुंखे यांच्यावरही गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चोपडा येथे शिरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ काही युवक पिस्तूल खरेदीला येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रात्री दहाच्या सुमारास तेथे सापळा रचला होता. त्या वेळी हे चौघेही तेथे आले. त्यांनी संशयितांनी शस्त्र खरेदी करणाऱ्या सूरज साळुंखे (रा. कराड) याच्या सांगण्यावरून परराज्यातील सागर सरदारशी संपर्क साधला. त्याच्याजवळून सहा गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस खरेदी करणार होते. ते पोलिसांनी जप्त केले. बेकायदेशीररीत्या शस्त्र जवळ बाळगले व पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने आढळून आल्याने पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात चौघांना अटक केली आहे.