औरंगाबाद : क्रांती चौकातून कोकणवाडी चौकाकडे जाताना ताबा सुटून भरधाव कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या कामानीला जाऊन धडकली. हा अपघात भीषण होता. 24 वर्षीय अथर्व अशितोष नावंदर हा तरुण जागीच ठार झाला. चालकाच्या बाजूनेच कार धडकल्याने स्टिअरिंग निखळले. अथर्वच्या मांडीचे हाड तुटून छातीला गंभीर दुखापत झाली होती. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला.
बन्सीलालनगरात राहणाऱ्या अथर्वचे वडील बांधकाम व्यवसायिक आहेत. लॉकडाऊनमध्ये महाविद्यालय बंद असल्याने मागील काही दिवसांपासून अथर्व मुंबईवरून घरी परतला होता. नेहमीप्रमाणे क्रांती चौकातील जिमला जाण्यासाठी स्कोडा रॅपिड कारने (एमएच 20 एफजी 7088) निघाला. मात्र साडेपाच वाजता काहीतरी काम आठवल्याने पुन्हा घराकडे वळला. बन्सीलालनगराच्या दिशेने जातांना गोपाल टी चौक ओलांडताच वळणावर त्याचा ताबा सुटला.
त्यामुळे भरधाव कार थेट रस्त्यावरील दिशादर्शक फलकाच्या डाव्या बाजूला असलेल्या खांबावर जाऊन आदळली. यात कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अथर्वच्या बाजूनेच कार आदळल्याने एअरबॅग उघडूनही त्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच गस्तीवरील पोलीसांनी धाव घेत त्याला कारमधून बाहेर काढून घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अथर्व अभ्यासात हुशार होता. सध्या तो मुंबईच्या महाविद्यालयातून डेटा सायन्सची पदवी घेत होता.