औरंगाबाद : शेतकरी गणेश ढोबळे यांना आठ जणांच्या टोळीने गंडविल्याचा प्रकार समोर आल्यावर औरंगाबादेतील शंकर स्वामी बहुउद्देशीय विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष व श्री साई सामाजिक विकास संस्थेचे उपाध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी जगन्नाथ खंडेराव जाधव उर्फ जे. के. जाधव यांना देखील सामाजिक उपक्रमासाठी संस्थेला पाच कोटी रुपयांपर्यंत मदत उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवून दहा लाखांना टोळीने गंडविल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. ट्रस्टचे आयसीआयसीआय बँकेत सात हजार ८८९ कोटी रुपये शिल्लक असल्याचे जाधव यांना सांगण्यात आले होते. संस्थेला मदत हवी असल्यास पाच लाख रुपये भरुन ट्रस्टचे सदस्यत्व घ्यावे, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. जाधव यांनी दोन्ही संस्थेच्या नावे प्रत्येकी पाच लाख रुपये भरले होते. विशेष म्हणजे त्यांच्या शैक्षणिक संस्थेतील शिक्षकानेच त्यांना या आरटीआय ट्रस्टकडे हजारो कोटी असल्याचे सांगितले होते.
आरटीआय ट्रस्टने जाधव यांना सदस्यत्वाच्या मोबदल्यात पाच कोटी रुपयांचा चेक दिला होता. परंतू चेक बँकेत जमा करु नका, असे ट्रस्टने सांगितले होते. पुढे ट्रस्टने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. तेव्हा ट्रस्टचे फिनो बँकेशी टायप झाले असून, तेथे चारशे कोटी रुपयांची एफडी करत आहोत. त्यामुळे रक्कम जमा झाल्यावर पैसे देतो असे सांगितले. मात्र, वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने जाधव यांनी अखेर खारघर पोलीस ठाणे गाठत ४ जून रोजी आरटीआय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी यांच्यासह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे. जाधव यांच्यानुसारच जवळपास पंधरा जणांची आरटीआय ट्रस्टने एक कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा जाधव यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
ढोबळेला असे ओढले जाळ्यात
गणेश ढोबळे यांनी सांगितल्यानुसार, त्यांना जमिनीचा ३० लाख रुपये मोबदला मिळाला होता. ही रक्कम त्यांनी बँकेत एफडी केली होती. दरम्यान, ढोबळे यांना प्लॉट किंवा घर घेण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी त्यांना सचिन जाधव, योगेश उभेदळ आणि अशोक शेजुळ या ब्रोकरने ढोबळे यांना अण्णासाहेब लोखंडे यांचा कांचनवाडी परिसरातील फ्लॅट विक्रीसाठी असल्याचे सांगितले होते. ढोबळे यांना फ्लॅट पसंत पडल्याने त्यांनी पुढील व्यवहारासाठी लोखंडेशी संपर्क साधला होता. पण त्याचदरम्यान टोळीतील आदित्य गारपगारे व त्याचा मामा मंगेश भागवत यांनी ढोबळे यांना बँकेतून कर्ज घेऊन देतो असे सांगितले होते. तसेच ट्रस्टकडे पैसे गुंतविल्यास त्या मोबदल्यात ३२ लाख रुपये देण्याचे आमिष गारपगारे आणि भागवत यांनी दाखवले होते. मात्र, ढोबळे यांनी नकार दिला होता. दरम्यान, लोखंडे याने इसारपावती स्वत:च्या नावे करुन दिली. पण ढोबळे यांच्या खात्यातील २५ लाखांची रक्कम गारपगारे याच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले होते. परंतू आता मुदत निघून गेल्याचे सांगत लोखंडे यानेच इसारपावती रद्द झाल्याचे ढोबळे यांना सांगितले होते. पैसे देऊनही फ्लॅट न मिळाल्याने खचून गेलेल्या ढोबळे यांनी अखेर सातारा पोलिसात धाव घेतल्याचे ते म्हणाले. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मारुती दासरे करत आहेत. दरम्यान, याप्रकरणातील गुन्हेगार पुण्यात ठाण मांडून आहेत. तसेच याप्रकरणाशी संबंधीत पुरावे ढोबळे यांनी पोलिसांना दिल्याचेही दासरे यांनी सांगितले.