हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. शनिवार दि. 27 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून ही सवलत दि. 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गणेशभक्ताना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव ३१ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे.
मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गणेश भक्तांना टोल सवलत देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी पासची आवश्यकता आहे.
टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2022, कोकण दर्शन’ असे स्टिकर स्वरुपातील टोल माफी पास आवश्यक असणार आहे. या पासवर वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांच्याकडे उपलब्ध असणार आहेत. या विभागांनी परस्परात समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये हे पास उपलब्ध करुन द्यावेत. असे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच परतीच्या प्रवासाकरीता हेच पास ग्राह्य धरण्यात येणार असल्याने ते जपून ठेवावे लागणार आहेत.