बिहार विधानसभा निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे, शिवसेनेत रंगणार सामना; सेना ५० उमेदवार उभे करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेल्या बदनामीचा शिवसेना वचपा घेण्यासाठी सज्ज झाली आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. 2015 मध्ये शिवसेनेने 80 जागा लढवत 2 लाखांपेक्षा जास्त मत घेतली होती. यंदा शिवसेना 50 जागा लढवून इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे.याशिवाय बिहार विधानसभा निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे आणि शिवसेनेत सामना रंगणार आहे. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी संशय व्यक्त केला होता, त्यांना टक्कर द्यायला शिवसेनेचा मावळा सज्ज झाला आहे, असं मत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी वक्त केलं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“सुशांत सिंह राजपूत प्रकरणात विनाकारण महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेला बदनाम करण्यात आलं. लोकांना कळतंय यामध्ये कोणाचा काहीही संबंध नव्हता, तरीही सूडबुद्धीचं राजकारण केलं. आम्ही आता बिहार निवडणुक लढवून याची परतफेड करणार आहोत. बिहार निवडणुकीत आम्ही 50 जागा लढवत आहोत. 2015 ला शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढली होती, ज्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त मतं शिवसेनेनं घेतली होती,” असं अनिल देसाई यांनी सांगितलं.

गुप्तेश्वर पांडेंविरोधात शिवसेना लढणार?
पोलीस महासंचालकपदाचा राजीनामा देऊन नुकतेच जेडीयूमध्ये प्रवेश केलेल्या गुप्तेश्वर पांडेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं अनिल देसाई यांनी सांगितलं. गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. “डीजीपी पदावरचा माणूस कसा बोलत होता, त्याचा अभिनय कसा होता हे सर्वांनी पाहिलं होतं. या पदावर राहून असं वक्तव्य करणं हे पांडेंना न शोभणारं होतं. पण आमचा मावळा त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. पांडेंना महाराष्ट्राची ताकद कळेल, आम्ही त्यांच्यासमोर उमेदवार देत आहोत,” अशी माहितीही अनिल देसाई यांनी दिली.

कोणत्या मुद्दयांवर निवडणुकीला सामोरं जाणार?
शिवसेना ही महाराष्ट्र वाढलेली पार्टी आहे पण बिहारमध्ये आम्ही स्थानिक मुद्दे घेऊन निवडणूक लढणार आहोत, असं अनिल देसाई यांनी सांगितलं. तसंच “हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही गेली अनेक वर्ष निवडणूक लढत आलो आहेत, यापुढेही आम्ही लढू. आम्ही हिंदुत्त्व सोडलेलं नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रात काँग्रेससोबत बिहारमध्ये विरोधात का?
महाराष्ट्रात सत्तेत काँग्रेससोबत असलेली शिवसेना बिहारमध्ये मात्र विरोधात लढताना दिसणार आहे. याविषयी अनिल देसाई म्हणाले की, “महाराष्ट्रात जरी काँग्रेससोबत असलो तरी बिहारमधील मुद्दे आणि राजकारण वेगळं आहे. प्रत्येकजण आपल्या अजेड्याने पुढे जात असतो, त्याप्रमाणे शिवसेना पुढे जात आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment