राज्यात १५ वर्ष जुन्या रिक्षांना लागणार ब्रेक! राज्य परिवहन विभागाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील राज्य परिवहन विभागानं रिक्षांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यात रिक्षांची वयोमर्यांदा १५ वर्षे करण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतला आहे. यापूर्वी ही वयोमर्यादा २० वर्षे इतकी होती. मुंबई एमएमआर परिसरात ही वयोमर्यादा २० वर्षांवरून १५ वर्षांवर आणण्यात आली असून इतर भागांमध्ये ती टॅक्सींप्रमाणे करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. २४ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या बैठकी दरम्यान या निर्णयाला मंजूरी देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

माजी आयएएस अधिकारी बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसींच्या आधारावर राज्य परिवहन प्राधिकरणानं हा निर्णय घेतला. २०१७ मध्ये खटुआ समितीनं महाराष्ट्र सरकारला यासंदर्भातील आपला अहवाल सोपवला होता. त्यापैकी रिक्षांची वयोमर्यादा कमी करण्यासह अनेक महत्त्वाच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या आहेत.

काय आहे नवा निर्णय?
नव्या निर्णयानुसार १ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई एमएमआर परिसरात १५ वर्षांपेक्षा जुन्या रिक्षा चालवण्यास बंदी असेल. तर उर्वरित महाराष्ट्रात १ ऑगस्ट २०२४ पासून हा निर्णय लागू होणार आहे. २०१३ पूर्वी राज्यात टॅक्सींसाठी वयोमर्यादेचं बंधन घालण्यात आलं असलं तरी रिक्षांसाठी मात्र बंधन नव्हतं. राज्यात सध्या १० लाखांपेक्षा अधिक रिक्षा रस्त्यांवर धावत आहेत. यापूर्वी हकीम समितीनं केलेल्या शिफारसींच्या आधारावर १ ऑगस्ट २०१३ पासून राज्य परिवहन प्राधिकरणानं रिक्षा आणि टॅक्सींची वयोमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापूर्वी राज्यात रिक्षांसाठी कोणत्याही वयोमर्यादेचं बंधन नव्हतं. तर दुसरीकडे राज्य परिवहन प्राधिकरणानं राज्यातील टॅक्सींना २५ वर्षांच्या वयोमर्यादेचं बंधन घातलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment