हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंढरपूरच्या (Pandharpur) एका शाळेमध्ये अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक प्रकार घडला आहे. येथील एका शाळेतील पोषण आहारामध्ये बेडकाचे पिल्लू सापडले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर टीका केली जात आहे. तर पालकांकडून घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. महत्वाचे म्हणजे या घटनेतून मुलांच्या जीवाशी शासनाचा खेळ सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरमधील कासेगाव येथील भुसेनगरच्या अंगणवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंगणवाडी शाळेमध्ये मुलांना पोषण आहार वाटप करत असताना पोषण आहाराच्या पातील्यामध्ये बेडकाचे मृत पिल्लू सापडले. यानंतर अंगणवाडीमध्ये चांगलाच गोंधळाला उडाला. सध्या सोशल मीडियावर देखील या घटनेचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांकडून घडलेल्या प्रकाराबाबत चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, मुलांना वाटण्याचा येणाऱ्या पोषण आहारामध्ये एखादा प्राणी आढळण्याची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये विद्यापीठातील होस्टेलच्या मेसमध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या चटणीत जिवंत उंदीर सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना ताजी असतानाच आता पंढरपूरमध्ये पोषण आहारात मेलेले बेडूक सापडले आहे. या कारणामुळे आता शालेय पोषण आहार योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.