ग्रामसेवक ते सहायक पोलीस निरीक्षक व्हाया राष्ट्रपती पदक – रिक्षाचालकाच्या मुलाच्या जिद्दीची कहाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चार वर्षांपूर्वी कोरेगाव तालुक्यातील पळशी स्टेशन येथे पाणी फौंडेशनचे काम सुरु होतं. लोक काम करत होते. या लोकांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी पुण्याहुन सातारला अतिरिक्त कार्यभार मिळाल्याने एक तरुण गावातच पाणी फौंडेशनच्या कामात बारकाईने लक्ष देत होता. नुसतं लक्षच नाही तर सकाळी काम करुन पुन्हा कामासाठी साताऱ्याला कामावर हजर व्हायचा. काम सुरु असताना शैलेश गायकवाड यांनी पूर्ण 45 दिवस अनवाणी (चपला न वापरता) पाणी फाउंडेशनचं काम केलं. पंचेचाळीस दिवस काट्या कुट्यांची, दगड धोंड्यांची भीती न बाळगता शैलेश गायकवाड हे सर्वांसोबत गावासाठी झटत राहिले.

लहानपणीच शेती डोळ्यासमोर पाहिलेली. त्या चिमुकल्या पायांना शेतातली माती केव्हाच लागली होती. मातीत दुडुदुडु पळणारे, खेळणारे ते पाय बघता बघता त्याच मातीसाठी, गावच्या लोकांचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी असं काम करायचं की पाणी हे डोळ्यांत नाही तर गाव-शिवारात पहायचे या भावनेने पाणी फौंडेशनच्या कामातुन स्वत: पंचेचाळीस दिवस चप्पल न घालता ते फिल्डवर काम करत राहीले..

1983 ला जन्मलेल्या शैलेश यांचं बालपण शेतकरी कुटुंबात गेलं. वडील साताऱ्यात रिक्षा ड्रायव्हर.. त्यातुन मिळणाऱ्या पैशांतून त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. साताऱ्यातील महापालिकेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे पुढचे शिक्षण त्यांच्या गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. साताऱ्यात रिक्षा चालवणारे त्यांचे वडील गावी आले. आणि गावची शेती सांभाळत रिक्षा चालवू लागले. शैलेश लहानपणापासूनच मितभाषी असलेल्या शैलेशने खेळाची आणि अभ्यासाची आवड आजपर्यंत जोपासली.

सातारा, पळशी, देऊर, फलटण अशा ठिकाणी त्यांचे शाळा, कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांचा शैक्षणिक प्रवास जरी वेगवेगळ्या ठिकाणी झाला असला तरी त्यांची ओळख ही नेहमीच गुणवंत विद्यार्थी म्हणून राहिली. आई वडिलांच्या कष्टासोबतच परिस्थितीची जाण ठेवत शैलेश यांनी आपल्या शिक्षणाचा पाया मजबुत केला. दहावीला असताना तर मुधाईदेवी विद्यामंदीर या देऊरच्या शाळेत सुदर्शन कुंभार या मित्रासोबत अभ्यासात विशेष कष्ट घेतल्याचे ते आवर्जून सांगतात. महामुलकर सरांकडे ते रात्री दीड वाजेपर्यंत गणिताचा अभ्यास करत बसायचे. बी.एस्सी ऍग्रीचे शिक्षण कोल्हापूरातून घेतल्यानंतर त्यांना स्पर्धा परीक्षेचीही ओढ वाटू लागली. यावेळी त्यांचे नातेवाईक श्री.प्रमोद शिंदे (उपसचिव मंत्रालय), आणि श्री. राजेंद्र पवार (सहायक आयुक्त, विक्रीकर विभाग) यांचा आदर्श डोळ्यासमोर होता. बीएससीच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. यावेळी बंधु गणेश गायकवाड आणि बाळकृष्ण गायकवाड यांनी त्यांना आधार दिला.

परिस्थितीचा बाऊ न करता संघर्ष करत शैलेश यांनी आपला प्रवास सुरू ठेवला. क्रीडा क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना कॉलेजमधे सततच्या सरावाने आणि जिद्दीने त्यांनी अॅथेलॅटिक्समधे चॅम्पियनशिप पटकवली. टेबल टेनिस, खोखो अशा विविध खेळांतही त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. 2003 साली अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेत त्यांनी विद्यापीठाकडुन प्रतिनिधित्वही केलं. ग्रामसेवक पदासाठी लागणारा अभ्यास चालूच होता. 2005 साली त्यांना ग्रामसेवक या पदासाठी अभ्यास करताना, फक्त पुस्तकांच्या माध्यमातून नाही तर त्यातील जाणकार व्यक्तींकडूनही शिकण्याचं महत्व त्यांना समजलं. त्यानंतर ते राहुरी येथील कृषीविद्यालयात अभ्यासासाठी पोहोचले. तिथे त्यांना कृषीमित्र एकता मंचच्या माध्यमातुन अनेक वरिष्ठ कृषीमित्रांची मोलाची मदत मिळाली. अभ्यास कसा करावा, काय वाचावे..त्याच्या पद्धती,या सगळ्याचे मार्गदर्शन त्यांना राहुरी येथील कृषी विद्यालयात मिळाले.

राहुरी हा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे असं ते आवर्जून सांगतात. अथक प्रयत्नांच्या जोरावर शैलेश गायकवाड डिसेंबर 2005 ला उमरोली.ता.चिपळुण जि.रत्नागिरी येथे ग्रामसेवक पदावर रुजू झाले. मितभाषी असणाऱ्या शैलेश यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळात आपल्या कामाचा डंका असा वाजवला की ग्रापंचायत उमरोलीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत तालुका आणि जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. ग्रामपंचायतीस यशवंत पंचायतचा दर्जाही प्राप्त झाला. कोकण विभागाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार ही ग्रामपंचायतीने याच काळात मिळवला. पुढे तिवरे व रिटकोली या जंगलसदृष्य गावांमधेही त्यांनी तितक्याच ताकदीने काम करत त्या गावांना निर्मल ग्राम पुरस्कार मिळवुन देण्यात मोठा वाटा उचलला. त्यांच्या या कामाची दखल घेत कोकण विभागातर्फे सामाजिक एकता पुरस्कार ही त्यांना मिळाला.
घेतलेल्या शिक्षणाचं, मन लावुन केलेल्या अभ्यासाचं कुठतरी चीज होतय याचा आनंद शैलेश यांना होताच..पण इतक्यावरच शांत बसायच नाही असं त्यांनी ठरवलं होतं. या सगळ्या कामातुन त्यांनी 2005 ते 2010 या काळात पोलिस परिक्षेचा अभ्यास चालु ठेवला होता.

कामाचा प्रचंड ताण, जंगल भाग असल्याने होणारी पायपीट, त्यातुन लोकांच्यापर्यंत पोहोचत, त्यातुन ही त्या गावांसाठी झटत त्यांना पुरस्कार मिळवुन देणारे शैलेश एमपीएससी परिक्षेचा अभ्यास वेळात वेळ काढुन करत होते. वेळेचे नियोजन होत नव्हते. दिवसभराच्या थकव्याने त्यांना आरामाची गरज होती पण तिथे ही त्यांनी हार मानली नाही. त्यातुन ही योग्य ते नियोजन करत काम व अभ्यास करत राहीले.

पहिल्या दोन टप्प्यात त्यांना अपयश आले. मन खचलं.. नाराज झाले.. पण घरुन त्यांना मिळणारा पाठीवरचा हात मागे हटला नाही.. कितीही काहीही होऊदेत.. तु लढ.. आम्ही सोबत आहोत तुझ्या.. तु करत राहतोयस हेच महत्वाचय.. घरुन ही वाक्ये कानावर पडताच शैलेश यांना बळ मिळालं. यानंतर त्यांनी आपला अभ्यास कामासोबत चालुच ठेवला. अवांतर वाचन करताना त्यांच्या द अल्केमिस्ट हे पुस्तक वाचनात आले आणि त्यामुळे त्यांना त्यातुन ही प्रेरणा मिळाली. या दरम्यान 2010 साली बेल्ट रेसलिंग या खेळात त्यांना राज्यस्तरिय सुवर्णपदक मिळाले. टेबल टेनिस, खोखो, तिहेरी उडी या खेळात ही त्यांनी आपली चुणुक दाखवली. खेळाची आवड शाळेपासुनच जोपासल्याने व एनसीसीमधेही आपली चमक दाखवल्याने आपसुक आलेला शिस्तप्रियपणा पुढे कामात ही दिसत होता. याच खेळाच्या जोरावर त्यांना या कार्यकाळात चिपळुण तालुक्याचे तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्षपद आणि रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे उपाध्यक्षपद मिळाले.

आयुष्याला कलाटणी देणारं 2010 साल – शैलेश यांचा ग्रामसेवक पदाचा कार्यकाल संपत आला होता. आणि ज्या पीएसआय पदासाठी त्यांचा अभ्यास चालु होता. त्यात ते या वर्षी पास ही झाले. आणि नाशिक येथील प्रशिक्षण पूर्ण करुन मुंबईतील कुर्ला येथे पीएसआय पदावर रुजु ही झाले.
आणि गावातील सर्वात पहिले पीएसआय म्हणुन गावच्या शिरपेचात शैलेश यांच्या रुपाने मानाचा तुरा रोवला. गाव आनंदलं. पेढे वाटले. पीएसआय झाल्याचे कळताच गाव व पंचक्रोशीतील लोक अभिनंदनासाठी शैलेश यांना भेटायला आले. आई वडील चुलते व भावंडे आनंदली. आत्तापर्यंतच्या कष्टाचं हे फळ होतं.

अभिनंदनाचा वर्षाव सुरुच होता. आई वडील मुलाला बिलगले. आईच्या डोळ्यातले आनंदाश्रु शैलेशनी पाहिले. अन त्यानंतर त्यांना ही त्यांचे आनंदाश्रु आवरता आले नाहीत. काही क्षण शब्दात मांडता येत नाहीत. किंबहुना ते मांडायचे ही नसतात. हा क्षण त्यापैकीच एक होता. त्यादिवशी घरात गोडधोड बनलं होतं. आणि इतके दिवस शैलेश यांच्या काळजीत असणार्या आई वडीलांना त्या दिवशी दोन घास जास्त गेले. इतक्या वर्षांनी त्या दोन घासाची जागा त्यांच्या पीएसआय पदावर भरती होण्याने भरुन निघाली होती.

कामावर रुजु होण्याची तारीख जवळ आली होती. तो दिवस आला आणि कुटुबियांना भेटुन ते कुर्ल्याला रवाना झाले. ग्रामसेवक पदावर काम करताना दाखवलेली कामातील चुणुक त्यांनी इथेही जपली. आता जबाबदारी मोठी होती. आधी जेवायला थोडातरी वेळ होता. पण आता तर तो ही नव्हता. कौतुकाची थाप त्यांना तिथे ही मिळाली. 2010 ते 2014 या कार्यकाळात त्यांनी आपली छाप निर्माण केली. मुंबईमधे कार्यरत असताना बनावट नोटा, आयटी अॅक्ट, पासपोर्ट अॅक्ट, खुन चोरी, यांसारख्या तपास प्रकरणांमधे कित्येक आरोपींना न्यायालयाकडुन शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत.

दहशतवादविरोधी पथकामधे देखील त्यांच्या कामाचे कौतुक वरिष्ठांकडुन झाले होते. साठच्या वर त्यांना आजवर त्यांच्या कामाची दखल घेत बक्षिसे मिळाली आहेत. अाणि ज्या पुढच्या पदापर्यंत पोहोचायला काही वर्षे लागतात त्या सहायक पोलिस निरिक्षक पदावर आपल्या कामाच्या माध्यमातुन ते चारच वर्षात पोहोचले. मुंबईहुन पुण्यात बदली झाली. आणि शैलेश यांना गावाकडे यायला वेळ मिळाला.

वडिलांचे रिक्षा चालवत मुलांचे शिक्षण पाहणे, चरितार्थ चालवणे, शेती पाहणे या सगळ्यातुन शैलेश यांची जडणघडण होत त्यांचे ध्येय साध्य झाले होते. पण या सार्यांसोबत शैलेश यांचे सामाजिक क्षेत्रात ही योगदान मोलाचं राहिलय. 2010 साली जि.प.शाळा पळशी या गावचा शतकमहोत्सवी कार्यक्रम त्यांनी गावकर्यांसोबत साजरा केला. 2018 साली पाणी फौंडेशन चे काम तेव्हा नुकतेच चालु झाले होते. आणि त्यांची तळमळ पाहता पुण्यातील त्यांच्या वरिष्ठांनी अतिरिक्त कार्यभार म्हणुन सातारा जिल्ह्यासाठी त्यांची नेमणुक केली. आणि शैलेश यांना अखेर गावासाठी काम करण्याचा योग आला.

शेतकरी कुटुंबात जन्मलेले, त्यातुन बीएससी अॅग्री, ग्रामसेवक, पीएसआय आणि आता सहायक पोलिस निरिक्षक व क्रिडा संघटना पदाधिकारी या पदावर त्यांना काम करताना, सामान्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशिलतेने पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन दिसुन येतो. या आत्तापर्यंतच्या प्रवासात त्यांना कितीतरी माणसे भेटली. त्यांचे वडील उद्धव गायकवाड, चुलते दत्तात्रय गायकवाड, कृष्णात गायकवाड यांनी शैलेश यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. अशोक पिसाळ, शिवाजी पिसाळ, महामुलकर सर,नलगे सर, हणमंत पिसाळ, देसाई सर,देऊर हायस्कुल येथील शिक्षकवृंद, कृषिमित्र आणि नातलग यांसारख्या अनेकांनी त्यांच्या या प्रवासाला सकारात्मक करण्याचं काम केलंय असं शैलेश आवर्जुन सांगतात. त्याचप्रमाणे त्यांची आई,पत्नी प्राजक्ता यांची ही मोलाची साथ लाभत आहे.
त्यांची मुलगी मृण्मयी हिचे पुर्व प्राथमिक शिक्षण आर्मी स्कुलमधे सुरु असुन तिला तिचे वडिल पोलिस अधिकारी असल्याचा अभिमान वाटतो.

आपण ही भरती होऊ शकतो असं शैलेश भरती झाल्यानंतर अनेकांना वाटले. आणि त्यानंतर कितीतरी मुले पोलिस व आर्मी दलात भरती झाली.  विस्मयकारक वाटावा असा हा सहायक पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड यांचा प्रवास खरोखर प्रेरणादायी असा आहे. जानेवारी 2020 मधे त्यांना नागपुर पोलिस दलातर्फे पर्सन ऑफ द इअर नावाचा पुरस्कार ही मिळाला आहे.

आज ही ते सुट्टी काढुन गावी आले तरी तरुणांच्यात रमतात.. काय चाललय सध्या.. काय करतोयस.. काय शिक्षण घेतोयस.. पुस्तके लागली तर सांग..अभ्यासाचं काही वाटलं तर विचार अस ते आवर्जुन समोरच्याला विचारतात. पदावर कार्यरत आहे म्हणुन कोणता आविर्भाव नाही. अन त्याचा दिखावा ही नाही. आज ही ते सुट्टीला आले की साधा शर्ट पॅन्ट वापरतात. जेष्ठांच्या तब्बेतीची चौकशी करतात. सामाजिक बांधिलकी जपत त्यांच काम ते करत राहतात. अन कित्येक तरुणांना त्यांच्या पंखात ते बळ देत राहतात. गावच्या भौगोलिक परिस्थितीचा गावकर्यामना फायदा व्हावा म्हणुन भविष्यात गावपातळीवर सामाजिक स्तरावर पाण्यासाठी, शेतीसाठी लोकांसाठी काम करण्याचा त्यांचा मानस आहे.

इतकं सगळं असुनही त्यांचे आई वडील आज ही शेतात जातात. काम करतात. ऊन वारा पावसात पहिल्याइतकच ताकदीने काम करतात. ज्या रिक्षावर चरितार्थ चालवला त्या रिक्षाचा ही त्यांच्या या जडणघडणीत मोलाचा वाटा राहिलाय. एका शेतकरी कुटुंबातील रिक्षा चालकाचा मुलगा, तीन ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम करत राष्ट्रपती पुरस्कार मिळवुन देणार्या ग्रामसेवक नंतर क्रिडासंघटक आणि नंतर पीएसआय व आता सहायक पोलिस निरीक्षक आणि पर्सन ऑफ द इअर शैलेश गायकवाड यांचा हा संपुर्ण विस्मयकारक व प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी मार्गदर्शक ठरेल हे नक्कीच.

– विकी पिसाळ
9762511636

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like