उस्मानाबाद प्रतिनिधी |जनता मला देत असलेला प्रतिसाद बघून पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाला माझ्या विरोधात निवडणूक जिंकणे शक्य वाटले नाही. म्हणून त्यांनी माझ्या विरोधात षड्यंत्र रचून माझी बनावटक्लिप व्हायरल केली अशी प्रतिक्रिया उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. खासदार रविंद्र गायकवाड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवर ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.
२००४ साली उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दरम्यान मतदानाच्या दिवशी असेच षड्यंत्र करून पद्मसिंह पाटील विधानसभेला ४८४ मतांनी निवडून आले होते. त्यावेळी पद्मसिंह पाटील यांनी दैनिक जागृत जनप्रवास नावाच्या वृत्तपत्रात ” पवनराजे निंबाळकरांचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा” हि खोटी बातमी छापून आणली आणि निवडणूक जिंकली. जेव्हा सरळमार्गाने निवडणुका जिंकता येत नाहीत तेव्हा. पाटील कुटुंबाकडून असे षड्यंत्र आखले जाते असे ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत.
दरम्यान खासदार रविंद्र गायकवाड यांनी तुमच्यावर फिर्याद का दाखल केली असे विचारातच ओमराजे निंबाळकरांनी रविंद्र गायकवाड यांच्यावर टीका करण्याचे टाळले आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी १८ तारखेला मतदान घेतले जाणार आहे. मतदान सुरु होण्यास अवघे काही तास बाकी राहिले असताना या मतदारसंघात क्लिप नाट्य रंगात आले आहे.