“मी भारतात पाऊल ठेवताच करोना नष्ट होईल”; स्वामी नित्यानंदचा अजब दावा

swami nityanand
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. आता कुठे हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र स्वतःला ईशवराचा अवतार समजणाऱ्या स्वयंघोषित संत नित्यानंदचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ‘ मी भारतात पॉल ठेवल्यानंतरच कोरोनाचा कहर थांबेल आणि कोरोना पूर्णपणे नष्ट होईल असा दावा करण्यात आल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नित्यानंद याचा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे.

नक्की काय आहे व्हिडीओ ?

या व्हिडिओत नित्यानंदचा एक भक्त त्याला भारतामधून करोना कधी नष्ट होणार असा प्रश्न विचारतो. त्यावर उत्तर देताना नित्यानंदने, देवीने माझ्या अध्यात्मिक शरीरामध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं. मी जेव्हा भारतामध्ये पाऊल ठेवेन त्याचवेळी करोना भारतामधून नष्ट होईल, असंही पुढे नित्यानंद याने म्हंटले आहे .

नित्यानंदने १९ एप्रिल रोजी भारतामध्ये करोना लाटेच्या दुसऱ्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याने वसवलेल्या कैलासा देशात भारतीय भक्तांना प्रवेशबंदी जाहीर केली होती. नित्यानंदने वसवलेलं कैलासा बेट जगाच्या पाठीवर नक्की कुठे आहे याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण विविध माहितीच्या आधारे इक्वेडोर किंवा ऑस्ट्रेलियाच्या जवळपास कुठेतरी हे बेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याने ब्राझील, युरोपीयन देश आणि मलेशियामधून येणाऱ्या भक्तांवरही बंदी घातलीय. करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आदेश काढताना जगभरातील आश्रमही बंद करण्याच्या सूचना नित्यानंदने दिल्या होत्या. तसेच आश्रमातील भक्तांनाही कैलासात प्रवेश नाकारण्यात आला आहे. नित्यानंदने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली होती.

नित्यानंद हा मूळचा तामिळनाडूचा आहे. त्याचे खरं नाव राजशेखरन असं आहे. २००० साली त्याने बंगळूरु शहराजवळ स्वत:चे आश्रम सुरु केले. तेव्हापासूनच तो चर्चेत आला. तो स्वत:ला ईश्वराचा अवतार मानतो. २०१० साली त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर बलात्कार प्रकरणात पौरुषत्वाची चाचणीचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. गुजरात पोलिसांनी नित्यानंदने भारतामधून पलायन केल्याची माहिती न्यायलयाला दिली. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ साली नित्यानंदला जामीन मंजूर झाला. याचाच फायदा घेत तो देशातून पळून गेला.