सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शंभर कोटींच्या निधीतून २२ कोटी ७५ लाखांच्या, ४० कामांना आज स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. आयुक्तांच्या अधिकाराखाली असलेल्या ११७ कामांना मान्यता मिळाली असून त्याची पुढील प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती प्रशासनाने सभेत दिली. त्यामुळे शंभर कोटींचा निधी आता मार्गी लागत आहे. तर साठ हजार वृक्ष खरेदी करण्यासाठी ४५ लाखांची निविदा मागविण्याच्या विषयाला सभेत मान्यता दिली. या बरोबरच वृक्षांसाठी ट्री गार्ड खरेदी करण्याचा निर्णय सभेत झाला.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अजिंक्य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नगरोत्थान योजनेतून महापालिकेला शंभर कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याची निविदा प्रक्रिया झाली आहे. त्यापैकी २५ लाखांवरील ४० कामांना मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीच्या सभेत आला होता. प्रकाश ढंग, स्वाती शिंदे, मनोज सरगर आदी सदस्यांनी शंभर कोटींच्या कामांबाबत सद्यस्थिती काय आहे? याची माहिती विचारली.
प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला कि २६० कामांपैकी ५६ कामांच्या फेरनिविदा काढल्या आहेत. निविदा प्राप्त २५ लाखांवरील ४० कामे पहिल्या टप्प्यात मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविली आहेत. तर ११७ कामे ही २५ लाखांच्या आतील असून आयुक्तांनी याला मान्यता दिली आहे. त्यानुसार ठेकेदारांना समज व वर्क ऑर्डर देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सदस्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करत २२ कोटी ७५ लाखांच्या ४० कामांना मान्यता देण्यात आली आहे.