अंत्यविधीसाठी निघालेली अंत्ययात्रा थेट ग्रामपंचायतीच्या समोर

pishor
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेवरून वाद होत असल्याने जागेची हद्द कायम करून द्यावी, या मागणीसाठी संतप्त होत नातेवाईकांसह समाजबांधवांनी पिशोर ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्ययात्रा रोखून ठिय्या दिला. जोपर्यंत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत अंत्ययात्रा येथून हलणारच नाही, असा पवित्रा घेतल्याने पिशोरमध्ये काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पिशोरमधील दिगर भागातील शांताबाई सूर्यभान खडके (७२) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी रात्री निधन झाले. महानुभवपंथाच्या परंपरेनुसार भुईडाग दिला जातो पण भुईडाग देण्याच्या जागेच्या हद्दीवरून गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी वाद सुरू आहे. त्यामुळे शांताबाई यांचे अंत्यसंस्कार कसे करायचे यावरून समाजबांधवांमध्ये चर्चा झाली. विशेष म्हणजे या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा मागणीदेखील केलेली होती. रविवारी सकाळी शांताबाई खडके यांची अंत्ययात्रा घरापासून निघाली ती थेट पिशोर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच रोखली गेली.

संतापलेल्या नातेवाईकांसह समाजबांधवांनी मृतदेह ग्रामपंचायतीच्या आवारात ठेवला. अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेल्या जागेवरून नेहमी वाद होत आहे. आम्हाला हद्द कायम करून दिली जात नाही. जोपर्यंत हद्दीचा प्रश्न सोडविला जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामपंचायत पदाधिकारीही समोर येईनात. काही लोक प्रश्न मार्गी लागेल, अशी समजूत घालून अंत्यसंस्कार उरकून घ्यावा, अशी विनंती करत होते. परंतु संतप्त समाजबांधवांसह नातेवाईकांनी कोणाचेही एक ऐकले नाही.