भामरागड | दरवर्षीप्रमाणे यंदा ही गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे “जागतिक मूळनिवासी दिवस” साजरा करण्यात येणार आहे. भामरागड़ पट्टी पारंपारिक गोटूल समितीच्या वतीने जागतिक मूळनिवासी दिवस समारोहाचे दिनांक ९ ऑगस्ट रोजी मौजा बेजुर येथे आयोजण करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि विशेषत: भामरागड तालुका आदिवासी बहुल म्हणुन सर्वांना परिचित आहे. या भागात माडिया-गोंड आदिवासींची सख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील बेजुर या गावाजवळ बेजुर कोंगा नावाची पाहाड़ी आहे. या पहाडीच्या पायथ्याशी बाबलाई देवी आहे. दर वर्षी जानेवारी महिन्यात इथे मोठी जत्रा भरते. क्षेत्रात वास्तव्य करीत असलेले आदिवासी व अन्य समाज सदर जत्रेमध्ये मोठ्या आस्थेने सहभागी होतात. तालुक्यातील सर्वच सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात.
या कार्यक्रमात तालुक्यातील अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे. हा कार्यक्रम भामरागड़ पट्टी पारंपारिक गोटूल समितीच्या वतीने लोक स्वतः आयोजीत करतात. त्यामुळे भामरागड़ तालुक्यातील जनता अनेक मुद्यांवर चर्चा करून ठरावही पारित करणार आहे. जागतिक मूळनिवासी दिवसाच्या निमित्ताने भव्य सांस्कृतिक रैलीचेही आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी सर्व मूळ निवासी बंधवांना व अन्य जनतेला उपस्थित राहून आपले अधिकार जाणून घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या अधिकाराप्रती जागरूक होऊन जल, जंगल, जमीनीवर मालकी हक्क प्रस्थापित करून स्वशासन व स्वनिर्णय प्रक्रियेकडे वाटचाल करावी असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुक वक्ते व मार्गदर्शक म्हणून माजी सनदी अधिकारी प्रभू राजगड़कर उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर कैलाश अंडील (तहसीलदार, भामरागड़), एड. लालसू नोगोटी (जि.प. सदस्य), सुखराम मडावी (पं.स. सभापती), रतन दुर्गे (प्राचार्य, भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा), शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार, बिरादरी हेमलकसा इत्यादी मान्यवर जनतेशी संवाद साधनार आहेत.
९ ऑगस्ट हा दिवस जागतिक मुलनिवासी दिवस म्हणुन ओळखला जातो. सन १९९४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ९ आॅगस्ट हा दिवस जागतिक मुलनिवासी दिवस म्हणुन घोषित केला होता. जगभरातील आदिवासी बांधव हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. आदिवासी समाजाचे प्रश्न आणि समस्या यांकडे लक्ष वेधण्याकरता या दिवसाची घोषणा करण्यात आली होती.