म्हसवड | माण तालुक्यातील धामणी गावातील शेतकऱ्याने शेतात लावलेल्या 285 गांजाची झाडे म्हसवड पोलिसांनी जप्त केली. त्याची किंमत सुमारे 10 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शेतकरी बबन भिवा खाडे (रा. धामणी, ता. माण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धामणी येथील शेतकरी बबन भिवा खाडे यांनी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर होलार नावाच्या शिवारात 10 गुंठ्यात मक्याचे पीक घेतले आहे. या पिकामध्ये शेतकऱ्यांने गांजाची झाडे लावल्याची माहिती म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि बाजीराव ढेकले यांना मिळाली. याबाबत सपोनि बाजीराव ढेकले यांनी डीवायएसपी डॉ. नीलेश देशमुख यांना तातडीने माहिती दिली. तेव्हा म्हसवड पोलिसांनी टीमसोबत धामणी येथील होलार नावाच्या शिवारात तपास करण्यास सुरुवात केली.
या ठिकाणी डॉ. नीलेश देशमुख तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतात शोध घेण्यास सुरुवात केली असता, मक्याच्या पिकात 285 गांजाची झाडे आढळून आली. या झाडांचे वजन 100 किलो आहे. घटनास्थळी पोलिस पंचनामा करत आहेत. ही कारवाई डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार करे यांच्या उपस्थितीमध्ये सपोनि बाजीराव ढेकले यांनी ही कारवाई केली. त्यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल काकडे, सानप, बागल, तांबे, धुमाळ, काकडे, कुदळे, काळे, फडतरे, माळी व पोलिस पाटील यांचा सहभाग होता. रात्री उशीरापर्यंत बबन भिवा खाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास डॉ. निलेश देशमुख करत आहेत.