हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांना समाजसेवेसाठी मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली आहे. यासंदर्भाने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी म्हणून त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. शेतकरी, कष्टकरी जनतेच्या उत्थानासाठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या गणपतराव देशमुख यांचे नुकतेच ३० जुलै २०२१ रोजी सांगोला, जि. सोलापूर येथे निधन झाले. उद्या ,१० ऑगस्टला त्यांची जयंती आहे. यापार्श्वभुमीवर ढोणे यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, पद्म पुरस्कार समितीचे सदस्य आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, तसेच या समितीचे सर्व सदस्य, सदस्य सचिव यांना निवेदने दिली आहेत.
यासंदर्भातील निवेदनात ढोणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातून सर्वाधिक ११ वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम आबासाहेबांच्या नावावर आहे. एक पक्ष, एक मतदारसंघ, एक झेंडा यासाठी त्यांचे नाव घेतले जाते. प्रामाणिकपणा, कष्टाच्या जोरावर त्यांनी ५१ वर्षे सांगोल्याचे नेतृत्व विधासभेत केले. ते शेतकरी, कष्टकरी वर्गाबरोबरच दुष्काळी भागाचे व वंचित घटकांचे नेते होते. त्यांनी राजकीय पदांपेक्षा लोकसेवेला अधिक महत्व दिले. त्यामुळे सांगोलासारख्या दुष्काळी भागात परिवर्तन घडून आले. त्यांच्या पाणी चळवळीमुळे शासनाला धोरणात्मक निर्णय घेणे भाग पडले. त्यांना जनतेचे प्रेमही खूप लाभले. आमदार, विरोधी पक्षनेते, तसेच राज्याचे दोनवेळा कॅबिनेटमंत्रीपद त्यांनी सांभाळले. छोट्या कृतीतून त्यांनी नेहमी मोठे संदेश दिले.
गणपतराव देशमुख नेहमी एसटीने प्रवास करायचे, तसेच शासनाच्या पैशाने मिळणाऱ्या वृत्तपत्रांची रद्दी विकून ती शासकीय तिजोरीत भरायचे. त्यांच्या साधेपणाच्या अशी गोष्टी ठिकठिकाणी ऐकायला मिळतात. विधीमंडळ असो की रस्त्यावरची आंदोलने, त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद केला. ते राजकारणातील असामान्य व्यक्तीमत्व होते. त्यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला नेहमी उणीव भासत राहील. देशपातळीवरही त्यांचा मानसन्मान व्हायला हवा, अशी महाराष्ट्रातील लाखो लोकांची इच्छा असल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे.
केंद्र, राज्य शासनाने प्रकिया करावी
गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांची दि. १० ऑगस्ट रोजी जयंती आहे. हा दिवस श्रमिक दिन म्हणून साजरा केला जातो. आबासाहेबांचे कार्यकर्तृत्व एवढे मोठे आहे की, राज्य व केंद्र सरकारने स्वतःहून प्रक्रिया करून हा सन्मान घोषित करायला हवा, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.