सातारा | प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही मास्क न वापरणाऱ्या बेफिकीर नागरिकांच्या चक्क पाया पडून सातारा कोविड डिफेंडर ग्रुपच्या सदस्यांनी बाजारपेठेत गांधीगिरी केली. यावेळी ग्रुपतर्फे अनेकांना मास्कचे वितरणही करण्यात आले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने सर्वांना मास्क वापरण्याचे बंधन घातले आहे. तरीही अनेक नागरिक मास्कचा वापर न करता बेफिकीरपणे राहात होते. या नागरिकांमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अशा बेफिकीर नागरिकांना आता गांधीगिरीच्या माध्यमातून सत्कार करण्याचा निर्णय सातारा कोविड डिफेंडर ग्रुपच्या वतीने घेण्यात आला.
त्यानुसार या ग्रुपच्या सदस्यांनी साताऱ्यातील बाजारपेठ, मंडई, दुकानात मास्क न वापरता खरेदीसाठी आलेल्या, तसेच मास्क न घालता साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या पाया पडण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर नागरिक, दुकानदारांनी मास्कचा वापर करणे सुरू केले. या आंदोलनादरम्यान ग्रुपच्या सदस्यांनी अनेकांना मास्कचेही वितरण केले.