Ganpat Gaikwad Firing : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. याप्रकरणी महेश गायकवाड याना ४ आणि राहुल पाटील याना २ गोळ्या लागल्या असून दोघांनाही ठाण्यातील जुपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जुपिटर रुग्णालयामध्ये जाऊन दोघांचीही भेट घेतली आणि विचारपूस केली.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले –
यावेळी शुक्रवारी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती एकनाथ शिंदे यांनी पोलिसांकडून जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे”, अशी भावना शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा उपस्थित होते.
गोळीबाराचा व्हिडिओ समोर – Ganpat Gaikwad Firing
दरम्यान, महेश गायकवाड यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळलेला नाही. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलय, अशी माहिती ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे. दुसरीकडे गणपत गायकवाड यांचा पोलिस ठाण्यात गोळीबार करत असलेला व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये स्पष्ट दिसत आहे कि,गणपत गायकवाडांनी एकामागोमाग एक गोळ्या (Ganpat Gaikwad Firing) नेम धरून महेश गायकवाड यांच्यावर चालवल्या. जखमी अवस्थेत महेश गायकवाड तिथेच कोसळले तर पांढरा शर्ट घातलेला माणूस कसाबसा बाहेर पडला. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा गणपत गायकवाड यांनी पकडून मारहाण केल्याचे व्हिडिओतुन समोर आलं आहे.