किल्ले वसंतगडावर शेकडो पोलिस व दुर्गप्रेमींनी उचलला कचरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | वसंतगड किल्ला (ता. कराड) येथे सातारा पोलिस दल याच्याकडून आपले किल्ले आपली जबाबदारी या अभियानांतर्गत शेकडो पोलिस व युवकांनी सहभाग घेतला. या दुर्गप्रमेंनी चंद्रसेन तलावात पाण्यात उतरून पाणकणीस व जलपर्णी, प्लास्टिकसह कचरा वेचण्यात आला. दुर्गप्रेमींसमोर ऐतिहासिक किल्ले वसंतगड व सरसेनापती हंबीराव मोहिते, महाराणी ताराराणी यांच्या घराण्याचा जाज्वल्य इतिहास सांगण्यात आला. पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून ही किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहिमेचे सुरू आहे.

तळबीड येथे सकाळी सातच्या सुमारास पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक डाॅ. रणजित पाटील, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, तळबीडचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे, उंब्रजचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोड, रेखा दूधभाते, वाहतूक शाखेच्या सरोजिनी पाटील, वसंतगड ग्रामपंचायतीचे सरपंच अॅड. अमित नलवडे, रविराज चिंचकर, विनोद पाटील यांच्यासह तळबीड, शिरवडे, बेलवडे हवेली, तासवडे, सुपने, तांबवे, वसंतगड आणि वहागाव यासह अन्य शाळांमधील विद्यार्थी असे सुमारे 500 हुन अधिक ग्रामस्थ या मोहिमेत सहभागी होते.

सर्वप्रथम तळबीडमधील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अभिवादन केले. त्यानंतर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्षात किल्ले वसंतगडावर संवर्धन मोहिमेस प्रारंभ झाला. या मोहिमेत चार वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. कराड शहर, सातारा, तळबीड आणि उंब्रज पोलिस अशा या चार टीम होत्या. त्याचबरोबर मोहिमेत सहभागी झालेले ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी या चारही टीमसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी होते.

पोलिस अधीक्षक समीर शेख यांचा साधेपणा
पोलिस अधीक्षक समीर शेख हे कचरा उचलण्यासोबत वसंतगड किल्ल्याची माहिती जाणून घेत होते. प्रत्येक ठिकाणाचे महत्व त्यांनी इतिहास अभ्यासाकडून समजून घेतले. तसेच अनेकांसोबत फोटो काढले, गडावर डाॅक्टर, सामाजिक संघटना व गडाच्या योगदानात सहभागी प्रत्येकाची विचारपूर करत होते. तर तळबीड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा इतिहास ऐकण्यासाठी स्वतः जमीनवर खाली बसले होते. त्याच्या या साधेपणाने सर्वांना एक आपुलकीची भावना निर्माण झाली होती.