हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jai Jai Maharashtra Majha- केंद्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये आता राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ रोज सकाळी वाजवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक येथे ही घोषणा केली. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांसह सीबीएसई, आयसीएसई, आयबी अशा सर्व बोर्डांच्या शाळांमध्येही हा नियम लागू केला जाणार आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वाजवावे असा निर्णय (Jai Jai Maharashtra Majha) –
मंत्री भुसे (education minister of maharashtra dada bhuse) यांनी शिक्षण विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मराठी भाषा अनिवार्य केल्यानंतर आता राज्यगीताचा समावेश बंधनकारक केला आहे. शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वाजवावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शालेय वयापासून महाराष्ट्राचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि भौगोलिक महत्त्व समजून घेता येईल, असे भुसे यांनी सांगितले. राज्यगीताचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा अभिमान जागवणे आणि राज्याच्या परंपरांचा सन्मान करण्याची भावना रुजवणे हा आहे. शाहीर साबळे यांनी गायलेले आणि राजा बढे यांनी लिहिलेले हे गीत महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक मानले जाते.
शिक्षणमंत्री भुसे यांचा महत्त्वाचा निर्णय –
राज्यगीताचा (Jai Jai Maharashtra Majha) निर्णय यापूर्वी राज्य सरकारने सर्व शाळांसाठी लागू केला होता. मात्र, आता त्याची व्याप्ती वाढवत केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्येही ते सक्तीचे करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री भुसे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक शाळेत हे गीत वाजलेच पाहिजे. विद्यार्थ्यांना शालेय वयापासून राज्याची ओळख व्हावी, यासाठी राज्यगीताचा समावेश आवश्यक आहे. मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्ये याबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याची टीका होत असताना, राज्यगीत वाजवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यगीतामुळे विद्यार्थ्यांवर महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीची शिकवण कायम राहील, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला.
हे पण वाचा : ग्राहकांना फिशिंग घोटाळ्याचा फटका ; पोस्ट खात्यातून पैसे होतायत गायब