परभणी : हॅलो महाराष्ट्र – ( गजानन घुंबरे) – जिल्ह्यातील गंगाखेड नगरपालिकेच्या स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात दारूसह बिर्याणीची पार्टी झाल्याचा प्रकार घडला असून या गटारी पार्टीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गंगाखेड शहरातील नगरपालीकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही गटारी पार्टी झाल्याचे फुटेज व्हायरल झाल्यामुळे, नगरपालिकेचा कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. गटारी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला, नगरपालिकेच्या नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याप्रकरणी आता पार्टी करणाऱ्या सर्व लोकांवर कारवाई करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गंगाखेड नगर परिषदेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात 8 ऑगस्ट रोजी गटारी साजरी करण्याचा निंदनिय आणि संतापजनक प्रकार घडला आहे. या पवित्र सभागृहात काही लोक मांसाहारी जेवण घेत असल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसून आले असून काही लोकांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये मद्यप्राशन केल्याची चर्चा आहे . नगर परिषदेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात शहराच्या हिताचे निर्णय घेतले जातात अशा पवित्र सभागृहाचे पावित्र्य काही लोकांनी भंग केले आहे. हा प्रकार नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे घडला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच या प्रकारास थेट जबाबदार असलेले मुख्याधिकारी संतोष लोमटे व संबंधित कर्मचारी यांच्यावर तातडीने योग्य ती कठोर कार्यवाही करण्यात यावी . झालेल्या संपूर्ण प्रकरणात दोषी असलेल्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास शिवसेना व समविचारी पक्षांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल याची कृपया नोंद घ्यावी. आता प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.