हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gaurav More) एखादी भूमिका साकारायची म्हणजे त्या भूमिकेचा खूप अभ्यास करावा लागतो. प्रत्येक कलाकार आपल्या पदरी आलेल्या भूमिकेवर गहन अभ्यास करून त्यानंतर अंगीकारत असतो. यासाठी घ्यावी लागणारी मेहनत फार असते. मात्र केवळ देहबोली आणि डायलॉगबाजीने कोणतीही भूमिका पूर्ण होत नाही. तर एखादी भूमिका पूर्ण करण्यासाठी कलाकाराचा पेहराव आणि रंगभूषा, केशभूषा देखील तितकीच महत्वाची असते. साऊथचा अत्यंत गाजलेला बाहुबली जसा लोकांच्या लक्षात राहिला अगदी तसाच या सिनेमातील कालकेय देखील प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
सध्या सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्याने साकारलेला कालकेयचा लूक व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे या लूकमध्ये त्याला ओळखणे फारच कठीण झाले आहे. हा अभिनेता कोण आहे ते पाहूया.
कोण आहे हा अभिनेता? (Gaurav More)
सोशल मीडियावर ‘कालकेय’च्या जबरदस्त लूकमध्ये दिसणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून सर्वांचा लाडका MHJ फेम गौरव मोरे आहे. फिल्टरपाड्याचा बच्चन अशी अनोखी ओळख असलेला गौरव मोरे हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रकाशझोतात आला. या कॉमेडी शोमधून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गौरव सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्यामुळे तो आपल्या नवनवीन प्रयोगांबाबत कायम माहिती देताना दिसतो.
सध्या गौरव ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अलीकडेच त्याचा ‘भुलभुलैया’ चित्रपटातील छोटे पंडितचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि यानंतर आता त्याने नवीन लूक शेअर केला आहे. ‘बाहुबली’ या त्रपटात मुख्य भूमिकांसोबतच खलनायकाची म्हणजे ‘कालकेय’ची भूमिकाही प्रचंड गाजली होती. कालकेय हा त्याच्या विचित्र लूक आणि भाषेमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. त्याच्याच लूकमध्ये गौऱ्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
सेम टू सेम कालकेय…
गौरव मोरेने (Gaurav More) अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्याच्या या नव्या भूमिकेचा लूक शेअर केला आहे. सोबत ‘मॅडनेस मचाएंगे’ या कॉमेडी शोमध्ये आपण कालकेयची भूमिका करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. लांबसडक केस, शरीरावर रक्त आणि मार लागल्याच्या खुणा, तंतोतंत पोशाख आणि एक खोटा डोळा असा त्याचा लूक आहे. जो पाहून नेटकरी अवाक झाले आहेत. या लूकसाठी नेटकऱ्यांनी गौरवचे अभिनंदन आणि मेकअप आर्टिस्टचे कौतुक केले आहे. ‘अगदी सेम टू सेम कालकेय…’, असेही काहींनी म्हटले आहे.