टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याबाबत गौतम गंभीरचं मोठं विधान; पहा नेमकं काय म्हणाला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात येत असून त्याच्या जागी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात बीसीसीआय आहे. यामध्ये गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) नाव आघाडीवर असून बीसीसीआयचे सचिन जय शहा यांनी गंभीरसोबत चर्चा सुद्धा केली आहे. गंभीरच नाव जवळपास नक्की मानल जात आहे. मात्र अजून त्याने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याबाबत गौतम गंभीरने आपलं मौन सोडलं आहे. आपल्या देशाच्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवणं ही अभिमानाची गोष्ट असून मला ते आवडेल असं गंभीरने म्हंटल आहे.

नुकतेच युवा क्रीडाप्रेमींशी झालेल्या संवादाच्या प्रश्नाला उत्तर देताना गंभीर म्हणाला की, आपल्या देशाच्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवणं ही अभिमानाची गोष्ट आहे. मला भारतीय संघाचे प्रशिक्षकपद व्हायला आवडेल. तुमच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. तुम्ही 140 कोटी भारतीयांचे आणि जगभरातील अन्य भारतीयांचे प्रतिनिधित्व करत आहात आणि जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करता, तेव्हा यापेक्षा मोठा सन्मान कसा असू शकतो. भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी मदत करणारा मी नाही, तर 140 कोटी भारतीय भारताला विश्वचषक जिंकण्यास मदत करतील. जर सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आणि आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करू लागलो, तर भारत विश्वचषक जिंकेल असं गंभीरने म्हंटल.

दरम्यान, गौतम गंभीर भारताच्या लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणला जातो. २००७ च्या T20 वर्ल्डकप आणि २०११ च्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात गंभीरनेच दमदार खेळ्या करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. गंभीरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्याशिवाय मेंटॉर म्हणूनही त्यानं यशस्वी काम केले आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात गंभीरचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे गौतम गंभीरच भारताचा मुख्य प्रशिक्षक व्हावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे. गंभीर टीम इंडियाचा कोच झाल्यास 3.5 वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळेल.