सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून सुमारे सहा किमी अंतरावर असलेल्या क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील एका खासगी बंगल्यालगत वीस फूट खोल कोरड्या विहिरीत एक रानगवा पडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. यामध्ये हा रानगवा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. दरम्यान, नुकतीच पुण्याहून एक वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, क्षेत्र महाबळेश्वर परिसरात गव्यांकडून मुक्तपणे संचार केला जात आहे. वातावरणात उष्माघाताचे प्रमाण वाढले असल्यामुळे गव्यांकडून पाणी पिण्यासाठी मानवी वस्तीतही प्रवेश केला जात आहे. दरम्यान गुरुवारी एक गवा पाण्याच्या शोधात भटकंती करीत असताना एका कोरड्या विहिरीत पडला. कालांतराने त्या ठिकाणाहून जाणाऱ्या लोकांना गवा विहिरीत पडल्याचे व त्याला गंभीर दुखापती झाल्याचे आढळून आले.
यानंतर स्थानिकांनी याबाबतची माहिती महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर गव्याला बाहेर काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमसह पालिका जेएसबी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. वन विभागाने पुणे येथील तज्ज्ञांच्या रेस्क्यू टीमला संपर्क साधला आहे. गव्याला बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. गुरुवारी पाण्याच्या शोधात हा गवा विहिरीत पडला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.