पुणे- बंगलोर महामार्गावर जनरेटर जळून खाक : वाहतूक खोळंबली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
कोल्हापूर नाका कराड येथे उड्डाणपूल पाडण्यासाठी बॅरिकेटिंगचे काम सुरू आहे. मलकापूर फाट्याजवळ पश्चिमेकडील उपमार्गावर कंत्राटदाराचा जनरेटर पेटला. या घटनेमुळे महामार्गावर तसेच सेवा रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोयना औद्योगिक वसाहतीजवळ उपमार्गावर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत जनरेटर पूर्ण जळून खाक झाला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मलकापुर व कराड शहराच्या हद्दीत महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मलकापुरातील जुना उड्डाणपूल पाडण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून दुतर्फा बॅरिकेटिंगचे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येथील मलकापूर फाट्याजवळ पश्चिमेकडील उपमार्गावर हे काम सुरू होते. एका ठिकाणाहून पुढे काम करण्यासाठी ते डंपरमध्येज असलेले जनरेटर घेऊन जात होते. तो पुढे नेताना अचानक जनरेटरने पेट घेतला. थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. आग वाढल्याचे निदर्शनास येताच उपमार्गावरील वाहतूक लांबच थांबवून पेटता जनरेटर डंपरमधून खाली रस्त्यावर फेकला. या वेळी जनरेटरचा भडका उडाला.

यावेळी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मनसे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण यांच्यासह परिसरातील नागरिकांनी व कराड शहर पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक सरोजनी पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी परिसरातील नागरिकांसह वाहने बाजूला करून परिसर मोकळा केला. डंपर चालकासह सर्वांच्याच प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग दोन अग्निशामक बंबाच्या साहाय्याने अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत संबंधित जनरेटर जळून खाक झाला होता.