सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा नगरपालिकेत ठेकेदारांकडून वेळेवर पगार होत नसल्याने आज (शुक्रवारी) सकाळपासून घंटागाडी चालकांनी काम बंदचे आंदोलन केले आहे. साताऱ्यातील घनकचरा गोळा करणाऱ्या सुमारे 40 ते 45 घंटागाड्यावरील कामगार व हेल्पर या कामगारांनी घंटागाडी बंदचे आंदोलन केले. जोपर्यंत पगार केला जात नाही तोपर्यंत गाड्या बंद ठेवणार असल्याचे कामगारांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी ठेकेदाराकडून पगार वेळेत होत नसल्याने कामबंद करण्यात आले. 10 मे पासून कामगारांना पगार आज, उद्या करू असे सांगितले जात आहे. मात्र महिना संपत आला तरी पगार होत नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून पगार वेळेत होत नसल्याचेही कामगारांनी सांगितले.
कोरोना काळात घंटागाडी कामगारांना कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवली जात नाही. कोव्हिड कचरा उचलताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा सॅनिटायझर किंवा मास्क दिले जात नाहीत. त्यामुळे आम्हांला पगार वेळेत मिळाला तर आम्ही आमच्या खर्चाने सॅनिटायझ घेऊन आमची सुरक्षा आम्हीच करु, परंतु पगारच होत नसल्याने आमच पोट भरायच का सॅनिटायझर विकत घ्यायच असा आरोप घंटागाडी कामगारांनी केलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत पगार केला जात नाही, तोपर्यंत गाड्या बंद टेवणार असल्याचे कामगारांनी या वेळेस सांगितले.