औरंगाबाद : औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे त्यांनी दोन डोस घेतलेले आहेत. त्यानंतरही त्यांचा कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
डॉ. कानन येळीकर यांनी ३० जानेवारी रोजी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर दहा दिवसांपूर्वीच त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. दरम्यान, ११ मार्च रोजी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवली. त्यामुळे त्यांनी कोरोना तपासणी केली. त्याचा अहवाल शुक्रवारी कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे.
उपचारासाठी त्यांना घाटीत दाखल करण्यात येणार होते. मात्र, घाटीत ऑक्सिजन बेड्स आहेत. कारण येथे गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. डाॅ. येळीकर यांना कोणताही त्रास नाही. एखादा ऑक्सिजन बेड वाया घालविण्यापेक्षा तो गरजू रुग्णाला मिळाला पाहिजे, यासाठी खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार त्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉ. येळीकर यांनी केले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group