लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीवर नाराज असल्याने आत्महत्या केली आहे. एवढेच नाहीतर तिने ज्यावेळी गळफास घेतला, त्यावेळी ती आपल्या होणाऱ्या पतीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. या तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीला आत्महत्या करताना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पाहिले. यानंतर त्याने पोलीस आणि घरच्यांना याबाबतची माहिती दिली. ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवांच्या महुआपार या गावामध्ये घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. या तरुणीने आत्महत्येचे पाऊल का उचलले हे अजून समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी तरुणीच्या होणाऱ्या पतीला चौकशीसाठी बोलावले आहे. महुआपारमधील रहिवासी लालचंद यांनी आपली मुलगी कुमारी पूजा हिचे लग्न संतकबीरनगर जिल्ह्यातील एका तरुणासोबत ठरले होते. हे लग्न 29 मे रोजी होणार होते पण काही कारणांमुळे हे लग्न मोडले.
यादरम्यान पुजाचे आपल्या होणाऱ्या पतीसोबत फोनच्या माध्यमातून बोलणे होत होते. हा युवक नोएडामध्ये नोकरी करतो. मृत तरुणीच्या वडिलांनी सांगितले कि,तिच्या मृत्यूची माहिती नोएडामधून तिच्या होणाऱ्या पतीने आधी दिली होती. जेव्हा मी तिच्या रुमकडे गेलो, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून तिला खाली उतरवले मात्र त्या अगोदरच तिचा मृत्यू झाला होता. कुटुंबातील लोकांनी याबाबत अजून कोणतीही तक्रार दाखल केली नाही. या तरुणीने कुठल्या तरी गोष्टीमुळे नाराज असल्यामुळे लाईव्ह सुसाईड केली आहे. यामुळे तिच्या होणाऱ्या पतीला या गोष्टीची माहिती आधी मिळाली. याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.