नुकसानग्रस्त द्राक्ष शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या, राष्ट्रविकास सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकळी पाऊसाने जिल्ह्यातील द्राक्ष शेती उध्वस्त झाली आहे. सदारच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करावे या मागणीसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्र विकास सेनेने लाक्षणिक धरणे आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले.

सांगली जिल्ह्यात नोव्हेंबर पासून सतत अवकाळी पाऊस पडत आहे. बदलत्या हवामानाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊसाने द्राक्ष शेती पूर्णपणे उध्वस्त झाली असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावेत, दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सतत सुरु असलेल्या अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानामुळे पोंगा व फुलोरा अवस्थेत असलेली द्राक्ष मणी कुजणे, चिरणे, फुलोरा गळणे तसेच दावनीं, करपा, भुरी अशा विविध रोगांचा हल्ला झाल्याने द्राक्ष बागा निकामी झाल्या आहेत.

शेतकऱ्यांचे एकरी चार ते पाच लाखांचे नुकसान झाले असून औषधांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने खर्च वाढला आहे. महागडी औषधे फवारून सुद्धा पीक वाचविण्यात अपयश आले आहे. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करावेत, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी, गतवर्षी २०२० साली झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही दिली गेली नाही, त्यामुळे मागील नुकसान भरपाई आणि सध्याची नुकसान भरपाई कोणतेही निकष न लावता सरसकट देण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी राष्ट्र विकास सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शासनाने जर शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Comment