हे तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षडयंत्र; कुणाल राऊत यांचा पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर | सध्या राज्यात युवक काँग्रेसची रणधुमाळी सुरू असून त्याच दरम्यान भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर निशाणा साधत कुणाल राऊत यांच्या विजयासाठी नितीन राऊत यांनी संपूर्ण महावितरण काँग्रेसच्या दावणीला बांधली असा आरोप त्यांनी केल्यानंतर आता कुणाल राऊत यांनी भाजपच्या या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.

कुणाल राऊत यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत विक्रांत पाटील यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुका हा कॉंग्रेसचा अंतर्गत विषय आहे. युवक काँग्रेस अंतर्गत निवडणुकीचा अन्य कोणत्याही पक्षांशी संबंध येत नाही. कारण ही निवडणूक अन्य कोणत्याही पक्षाविरुद्ध लढली जात नाही तर काँग्रेस पक्षामधीलच युवक कार्यकर्ते विविध पदांसाठी ही निवडणूक लढत असतात. त्यामुळे या निवडणुकीचा शासकीय यंत्रणेशीही काहीही संबंध येत नाही असे त्यांनी म्हंटल.

मी आजवर तीनदा युवक काँग्रेसची निवडणूक लढली असून तीनही वेळा विविध पदांवर निवडून आलो आहे. प्रदेश युवक काँग्रेसचा मी सध्या उपाध्यक्ष असून यापूर्वी सरचिटणीस म्हणूनही निवडून आलो आहे. सध्याच्या निवडणुकीत वा यापूर्वी च्या निवडणुकीत मी माझ्या वडिलांची मदत घेतली नसून स्वबळावर मी निवडणूक लढलो आहे.

राज्यात काँग्रेसची सत्ता आहे की नाही याच्याशी या निवडणूकीचा काहीही संबंध नसतो. मी स्वतः या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर प्रचार आणि जनसंपर्क दौरे करीत आहे. युवक कॉंग्रेसच्या मतदारांना मी भेटून माझ्या निवडणूक लढण्यामागील उद्देश स्पष्ट करीत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभरात युवक काँग्रेससाठी मतदारांची नोंदणी सुरू आहे.

राज्यातील तरुणाई मोठया प्रमाणावर युवक काँग्रेसकडे वळू लागली आहे. १२ नोव्हेंबर पासून आजवर १५ लाखांहून अधिक तरुणांनी युवक काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यामुळे भाजपची चिडचिड होणे मी समजू शकतो. काँग्रेसमुक्त भारताची दिवास्वप्ने पाहणाऱ्या भाजपमध्ये काँग्रेसची ताकद वाढत असल्याने निराशा आलेली दिसते. या नैराश्यातून भाजपने काँग्रेसला, ऊर्जा मंत्री मा. नितीन राऊत यांना आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे असा पलटवार त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, युवक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष झाल्यास काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनवेल आणि भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जातीयवादी, सामान्यांना देशोधडीला लावणाऱ्या धोरणाविरुध्द संघर्ष करण्याचा संकल्प मी युवक काँग्रेसच्या मतदारांसमोर व्यक्त करीत आहे. यामुळे कदाचित भाजप माझ्यावर आरोप करीत आहे.

Leave a Comment