हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि हरित क्रांतीचे जनक एस. एम स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या या घोषणेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून देखील एक प्रमुख मागणी करण्यात आली आहे. त्यांनीशिवसेना प्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
राज ठाकरेंचे ट्विट
राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो.”
त्याचबरोबर, “बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं” असे राज ठाकरे यांनी म्हणले आहे.
त्याचबरोबर, “देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल” अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी केलेला या मागणीनंतर त्यांचे शिवसेना कार्यकर्त्यांकडून तसेच नेटकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या मागणीचा विचार करून सरकार बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.