हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा T20 विश्वचषक विजेता प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं अशी मागणी माजी क्रिकेटपटू आणि लिट्ल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी केली आहे. द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्याच वर्षी एशिया कप जिंकला होता. तसेच क्रिकेटपटू म्हणूनही त्याने भारताकडून चांगली कामगिरी केली आहे. हीच गोष्ट लक्षात ठेऊन सरकारने द्रविडला भारतरत्न पुरस्कार द्यावा असं गावस्कर यांनी म्हंटल.
सुनील गावस्कर यांनी एका स्तंभात लिहिले की, द्रविडने जे काही केले आहे ते लक्षात घेता भारत सरकारने त्याला भारतरत्न देऊन सन्मानित करणे योग्य ठरेल. तो एक उत्कृष्ट खेळाडू आणि कर्णधार आहे, त्याने वेस्ट इंडिजमध्ये त्यावेळच्या लोकप्रिय सिरीज जिंकण्याचे काम केले आहे तसेच इंग्लंडमध्ये जिंकणारा तो फक्त तिसरा भारतीय कर्णधार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद भूषवताना राहुल द्रविडने खेळाडूंच्या कलागुणांना जोपासले आणि नंतर तो भारताच्या वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक झाला.
राहुल द्रविड जेव्हा भारताकडून क्रिकेट खेळत होता तेव्हा त्याला जे काही सांगितलं ते सगळं त्याने केलं. कसोटीमध्ये दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या क्षणी भारताची विकेट पडली की खालच्या फलंदाजाला नाईटवॉचमन म्हणून पाठवण्याच्या जागी तो स्वत: यायचा. त्याने संघाच्या विनंतीनुसार यष्टीरक्षकाची भूमिका सुद्धा पार पाडली. कारण त्यामुळे खेळपट्टी आणि विरोधी परिस्थितीनुसार अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज निवडण्यात भारतीय संघाला मदत झाली. संघासाठी खेळण्याची हीच वृत्ती राहुल द्रविडने संघात निर्माण केली आहे . द्रविडच्या शांत स्वभावाचा सुद्धा चांगला परिणाम टीम इंडियावर झाला असावा, कारण भारताने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अतिशय रोमांचक सामन्यात संयम राखला होता.
वर्षाच्या सुरुवातीला समाजाची महत्त्वपूर्ण सेवा करणाऱ्या काही नेत्यांना भारतरत्न देण्यात आला. तथापि, त्यांचा बहुतांश प्रभाव त्यांच्या पक्षापुरता आणि ज्या देशातून ते आले त्या भागापुरतेच मर्यादित होते. द्रविडच्या कामगिरीने संपूर्ण देशाला आनंद झाला आहे ज्यामध्ये सर्व पक्ष, जाती, पंथ, समाज आनंदी आहेत.राहुल द्रविड निश्चितच देशाच्या सर्वोच्च कौतुकास पात्र आहे. त्यामुळे भारताच्या महान सुपुत्रांपैकी एक राहुल शरद द्रविडचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान करणे किती छान वाटेल? चला तर मग आपण एकत्रितपणे भारत सरकारला याबाबतचे आवाहन करूया असं सुनील गावस्कर यांनी म्हंटल.